आदिनाथसाठी पुन्हा एकदा अजितदादांची “मै हु ना !” ची साद ; शिंदे गटात उत्साह
करमाळा समाचार
आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात रोजच्या रोज नवनवीन ट्विस्ट व चर्चा समोर येत असताना आता संजयमामा शिंदे गटाला तसेच आदिनाथ सावरायला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी स्वतः लक्ष घालण्याचे संकेत दिसून येऊ लागले आहेत. नुकतीच माजी आमदार संजयमामा शिंदे व पश्चिम भागाचे नेते बारामती ॲग्रो चे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी अजितदादांची भेट घेऊन आदिनाथ बाबत चर्चा केली असल्याची माहिती समोर येत आहे.


करमाळा तालुक्याच्या राजकारणात सुरुवातीपासूनच पवारांना मानणारा गट आहे. उमेदवार कोणीही असला तरी पवारांच्या नावाचा दबदबा कायम तालुक्यात राहिलेला आहे. याचा प्रत्यय लोकसभा निवडणुका तसेच इतर निवडणुकांमध्येही दिसून आलेला आहे .याशिवाय ज्यावेळी स्थानिक नेत्यांना गरज भासते ते थेट पवारांकड धाव घेतात अशा परिस्थितीत अनेकदा पवारांनी करमाळा तालुक्याला सहकार्यही केले आहे. याशिवाय “मै हु ना” म्हणत पाठीशी उभा राहिले आहेत. त्यामुळे पवारांच्या पाठिंब्यावरच मोठे मोठे गड स्थानिकांनी सर ही केलेले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा पवारांच्या नावाची चर्चा महत्त्वाची ठरत आहे.
मागील काही काळात आदिनाथ अडचणीत असताना कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी सदरचा कारखाना भाडे तत्त्वावर घेण्याचा निर्णय ठरला व जल्लोषाचे वातावरण कामगार, शेतकरी व परिसरातील नागरिकांमध्ये होते. पवार यात लक्ष घालत आहेत म्हटल्यानंतर कारखाना सुस्थितीत येईल अशी शक्यता अनेकांना वाटू लागली होती. त्यामुळे जरी कारखाना भाडेतत्त्वावर जात असला तरी लोकांमध्ये समाधान होते पण त्यात अनेक अडचणी आल्या व तो विषय बाळगळला. पण पवार यात लक्ष घालत आहेत हा विषय महत्त्वाचा ठरला होता.
आता पुन्हा एकदा अजित दादा यांनी या प्रकरणात लक्ष घातले तर आदिनाथ अडचणीतून बाहेर आल्याशिवाय राहणार असा विश्वास शिंदे गटात आला आहे. सध्या राजकीय भूमिका बघायची झाली तर सुभाष गुळवे हे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. पण आदिनाथ साठी त्यांनीही पुढाकार घेत अजित दादा यांच्या भेटीला गेल्याची दिसून आले आहे. यामुळे सध्या शिंदे, गुळवे व अजित दादा यांच्या माध्यमातून आदिनाथ साठी चांगले दिवस आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे. शेवट निर्णय हा सभासदांचा असणार आहे. त्यामुळे अजित दादाचा पाठिंबा असला तरी सभासद मतदार सोबत जाणार का ? हा सर्वात मोठा प्रश्न पुन्हा उपस्थित होत आहे.