सावडीत आजपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
करमाळा समाचार – संजय साखरे
करमाळा तालुक्यातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या श्री हिरा भारती महाराज अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात सावडी येथे आज होणार असून या सप्ताहात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आपली सेवा बजावणार आहेत. या हरिनाम सप्ताहाचे निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रमही आयोजित केला असून या निमित्ताने करमाळा तालुक्याच्या विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

श्री हिरा भारती महाराज अखंड हरिनाम सप्ताहाचे हे 38 वे वर्षे आहे. सावडी येथील उद्योगपती सचिन देशमुख व भाऊसाहेब यदवते यांच्या हस्ते अभिषेक व हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज पुंडे यांच्या हस्ते कलश पूजन, ध्वजारोहण व विना पूजन होणार आहे.
या सप्ताहात मनोहर महाराज बेलापूरकर, निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर, संतोष महाराज आढावणे, मधुकर महाराज , प्रकाश महाराज साठे, माऊली महाराज पठाडे, विशाल महाराज खोले , माधव महाराज रसाळ या कीर्तनकारांची कीर्तने होणार आहेत.

मंगळवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी हरिभक्त परायण संजय महाराज पाचपोर यांच्या काल्याच्या कीर्तनाने या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे. तरी या अखंड हरिनाम सप्ताहाचा सावडी पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी लाभ घेण्याच्या आव्हान सावडी कर ग्रामस्थ व भजनी मंडळातर्फे करण्यात आले आहे.