एकही अपघात न करणाऱ्या चालकाने मोटारसायकलने धडक दिल्याने गमावले प्राण
करमाळा समाचार
राज्य परिवहन मध्ये चालक म्हणून कार्यरत असताना संपूर्ण कारकिर्दीत एकही अपघात न करणारे फुलचंद रंगनाथ हाके वय (५८) रा. खांबेवाडी ता. करमाळा यांचे मूळ गावी पायी जात असताना मोटरसायकल सोबत झालेल्या अपघातात निधन झाले आहे. सदरची घटना ती तीन रोजी सायंकाळी खांबेवाडी परिसरात घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, एसटी चालक फुलचंद हाके हे अवघ्या तीन महिन्यांने निवृत्त होणार होते. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत एकही अपघात न करणारे हाके हे मुळगावी गेले असताना दिनांक ३ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास संगोबा ते खांबेवाडी जाणाऱ्या रस्त्याने पायी जात होते. त्यावेळी सीनामाई हॉटेल समोर त्यांना एका अज्ञात मोटरसायकल स्वराने जोरदार धडक दिली.
यावेळी ते रस्त्याच्या कडेला बेशुद्ध अवस्थेत पडुन होते. त्यावेळी त्यांच्या डोके व शरीरावर ठिकठिकाणी जखमा झालेल्या दिसल्या. त्यांना त्या ठिकाणी असलेल्या लोकांनी खाजगी वाहनातून उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथे नेले असता डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मयत झाल्याचे सांगितले. यावेळी सदरची माहिती फुलचंद हाके यांचा मुलगा हिंदराज हाके यांनी दिली. यावरून अनोळखी मोटरसायकल चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक प्रविण साने हे करीत आहेत.