कंदरचे कृषीरत्न डोके यांच्या घरावर सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न ; हल्ल्यात दोन गंभीर जखमी
करमाळा समाचार
कंदर मध्ये किरण डोके व कुटुंबीय घरात झोपलेले असताना सशस्त्र दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला. यामध्ये विरोध केल्यानंतर धारदार शस्त्राने हल्ला करून दोघांना गंभीर जखमी केल्याची घटना कंदर येथे घडली आहे. या घटनेने संपूर्ण कंदरसह परिसर हादरलेला दिसून येतोय. कुटुंबीय घरात झोपलेले असताना अशा प्रकारचा हल्ला झाल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण आहे. तर पोलिसांनी तपासास सुरुवात केली असून प्रकरणाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

कंदर येथील राहत्या घरी पहाटे दिड ते अडीचच्या सुमारास अनोळखी सात ते आठ लोक घरात घुसले. यावेळी घरातील जागे झालेल्या सदस्यांना सदरचा प्रकार लक्षात आला. यावेळी झालेल्या गोंधळानंतर संबंधितांना दरोडा टाकण्यास आलेल्यांना अडवण्यासाठी पुढे आलेल्या दोघांवर संबंधित दरोडेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. यात दोघेजण जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी बाहेर पाठवण्यात आले आहे.

परिसरामध्ये ऊस तोडणीसाठी आलेले कोयते तसेच बाहेरून कामानिमित्त आलेले परप्रांतीय राहण्यासाठी आहेत. तर संबंधित प्रकारात ऊस तोडणीसाठी आलेले हत्यार वापरण्यात आल्याची तक्रार संबंधित कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे. तर कोयत्यांपैकीच काही लोक घरात घुसून हल्ला करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे अशा लोकांचा वेळीच शोध घेऊन कार्यवाही करणे गरजेचे आहे. घटनास्थळी मात्र मोजकेच पोलीस असल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले आहे. अधिकची यंत्रणा राबवून संबंधितांना तातडीने पकडावे अशी मागणी केली जात आहे.