निवडणुका जवळ आल्या की माजी आमदार पाटलांसाठी पायघड्या ; पाटलांच्या भुमीकेकडे लक्ष
करमाळा – विशाल घोलप
निवडणुका जवळ आल्या की लगेचच राजकीय पक्ष तसेच नेत्यांचे स्वरूप बदललेले दिसून येऊ लागले आहेत. काही दिवसांपूर्वी आदिनाथ कारखान्याचे खापर माजी आमदार नारायण पाटील यांच्यावर फोडणारा पक्षच व त्याचे कार्यकर्ते आता आबांना आपल्या पक्षात स्वागत करण्यासाठी पायघड्या अंथरून उभे आहेत. त्याशिवाय ज्यांनी पक्षात असतानाही आबांकडे दुर्लक्ष केले असे नेतेही आता भेटी घेऊन जाऊ लागले आहेत. यामुळे आधीच आपली पत खराब करुन घेतलेले राजकीय पक्ष कशा पद्धतीने रंग बदलतात हे दिसू लागले आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात कोणता पक्ष कधी कोणत्या पक्षासोबत युती करेल याची गणित कोणीच ठरू शकले नाही. अशा पद्धतीने बदललेली राजकीय गणिते आपण पाहिलेली आहेत. यामुळेच सध्या जनतेत राजकीय पक्षांच्या बाबत असलेली प्रतिमा अतिशय खराब झालेली दिसून येते. कोणत्याच पक्षावर सामान्य जनतेला विश्वास राहिलेला नाही. नेमकं आपण ज्या व्यक्तीला विरोध करून मतदान दुसऱ्याला करतो अखेर तीच व्यक्ती आणि तेच नेते जर सोबत येत असतील तर मतदान कोणाला करायचा असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडलेला आहे.

सुरुवातीच्या काळात माजी आमदार नारायण पाटील यांनी आपली राजकीय कारकीर्द राष्ट्रवादीसोबत सुरुवात केली असली तरी त्यांची चडणघडण ही शिवसेनेत असताना झाली व नावारूपाला आलेले पाटील यांनी शिवसेनेतून उच्चांक गाठला. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा तेच निवडून येतील अशी परिस्थिती असताना त्यांना डावलणाऱ्या शिवसेनेला सध्या दोन गटांमुळे अडचणीचा काळ बघावा लागत आहे. अशा परिस्थितीतही माजी आमदार नारायण पाटील यांनी तालुक्यात पहिल्या क्रमांकाचे मते मिळवलेले असतानाही त्यांचा विचार पक्षाकडून कधीही केला गेला नाही अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे.
तर आता लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला चांगल्या उमेदवाराची गरज भासत असून भाजपाने आपला उमेदवार जाहीर केला तरीही राष्ट्रवादीला अद्याप आपला उमेदवार जाहीर करता आलेला नाही. त्यांची अजूनही चाचपणीच सुरू आहे. कोणता नेता गळाला लागतोय का हे पाहिले जात आहे. हे सर्व प्रयत्न वरिष्ठ पातळीवरून आलेल्या आदेशावरून चालू असल्याचे दिसून येते. परंतु काही दिवसापूर्वी आदिनाथ कारखान्याच्या विषयावरून राष्ट्रवादीच्या एका नेत्यांनी आबांवरच तोफ डागली होती. त्यामुळे त्यावेळी चुकीचे वाटणारे पाटील आता त्याच राष्ट्रवादीला आपलेसे का वाटू लागले आहेत असा प्रश्न उपस्थित होत आहे.
त्यामुळे राजकारणात कोणीही कधीही कायमचा शत्रू नसतो हे जरी खरे असले तरीही कोण कोणाच्या सरळ स्वभावाचा फायदा उचलून धोका देईल हे सांगता येत नाही हेही तितकेच खरे आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात माजी आमदार नारायण पाटील हे ज्यांनी सोबत ठेवून दुर्लक्ष केले त्यांच्याकडे जातील का जे भाविकाळात काय करतील याची गॅरंटी नाही अशा पक्षासोबत जातील. सध्या तरी पाटील यांनी कोणतीही भूमिका जाहीर केली नसली तरी पाटील यांच्या भूमिकेकडे कार्यकर्ता तसेच तालुकावासियांचे लक्ष लागून राहिले आहे.