करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

मोहितेंची भुमीका – धनुष्यातुन सुटलेला बाण माघार घेणे अशक्य ; संकटमोचक रिकाम्याहाती माघारी ?

करमाळा समाचार – विशाल घोलप


वेगवेगळ्या कारणांमुळे मोठमोठे नेते भाजपा तसेच मित्र पक्षांमध्ये येण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे मोहिते पाटील यांनी स्वाभिमानासाठी लढायला सुरुवात केलेली दिसून येत आहे. नुकतेच भाजपाच्या माढा लोकसभेचा उमेदवार जाहीर झाला आणि मोहिते पाटील समर्थकांनी बंडाचं हत्यार उपसले. थेट देशातील बलाढ्य असलेल्या पक्षालाच आव्हान दिल्याने पुढे काय होईल याकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले आहे. मोहितेंनी स्वाभिमान कोणापुढे गहाण ठेवायचा नाही असे ठरवल्यामुळेच कुठेतरी बलाढ्य असणारा पक्षही त्यांच्यासमोर झुकेल असे दिसू लागले आहे. पण तरीही मोहिते कार्यकर्त्यांच्या भुमिकेवर ठाम राहिले तर केवळ जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात याचे पडसाद दिसु शकतात. त्यामुळे मोहिते पाटलांनी सोडलेला बाण माघारी येण्याची शक्यता नाही असे बोलले जात आहे. त्याची सुरुवात कालच्या बैठकीतुन केल्याचे दिसुन आले.

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या पक्षांमध्ये दुफळी निर्माण करून विविध कारणांनी पक्ष फोडाफोडी करून सत्तेत येणाऱ्या भाजपाला आता मोहिते पाटलांसारख्या स्वाभिमानी नेत्याला डिवचल्याचे परिणाम भोगण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात दबदबा असलेले मोहिते घराणे मोदी लाटेतही निवडून आलेले विजय दादा व मोहिते पाटील सांगेल तोच उमेदवार माढा लोकसभेतून निवडून येण्याची शक्यता असतानाही मोहिते पाटलांना डावलने चांगलेच महागात पडलण्याची शक्यता आहे. महायुतीसाठी सोपी वाटत असलेली निवडणूक आता कठीण झाली आहे. सध्याच्या वातावरणात माढ्याची जागा महाविकास आघाडीकडे जाईल असे चित्र निर्माण झाले आहे.

मोहिते पाटलांची उमेदवारी किंवा मोहितेंनी सांगितलेला उमेदवार डावलला तरीही मोहिते पाटील कुठेही जाणार नाही हा भ्रम भाजपाला झालेला असावा यामुळेच की काय भाजपाने पहिल्याच यादीत माढा लोकसभा मतदारसंघात मोहितेंना अपेक्षित नसलेले नाव सुचवले व तिथूनच खऱ्या राड्याला सुरुवात झाली. एकेकाळी माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांचे नाव चर्चेत असताना मोहिते समर्थकांच्या विरोधामुळे अखेर पवार यांनाही माघार घ्यावी लागली होती.

सध्या भाजपाची सर्वत्र चलती असून नाराजी असली तरीही कोणताही नेता भाजपा सोडून जाऊन त्यांचा रोष घेण्याच्या तयारीत दिसत नाही. तर दुसरीकडे विरोधी गटातील पक्ष स्वतःच अडचणीत आहेत. त्यामुळे अशा पक्षात जाऊन स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणार नाही असे चित्र सध्या निर्माण झाले होते. परंतु नाराज तसेच योग्य भागातील योग्य उमेदवार जवळ करत राष्ट्रवादीने (शपगट)मात्र आता ताकद दाखवून द्यायला सुरुवात केलेली आहे. अशातच मोहिते पाटील यांच्या नाराजीचा फायदा उचलत राष्ट्रवादीने त्यांना स्वतःकडे ओढून घेण्याचा प्रयत्न केला. अशात आज एक बैठकीही पूर्ण झाली यातून मोहितेंनी पुढे काय होईल यापेक्षा आपला स्वाभिमान गहाण ठेवायचा नाही. हा निर्णय कायम ठेवल्याने एका उमेदवारीसाठी संपूर्ण जिल्ह्याचे राजकारण हातून जाईल का काय ? याचे महाराष्ट्रात काय परिणाम होतील अशी भीती महायुतीपुढे निर्माण झालेली दिसून येत आहे.

त्यामुळेच की काय लगेचच उपमुख्यमंत्री फडवणीस यांनी आपल्या पक्षातील संकटमोचक गिरीश महाजन यांना तात्काळ अकलूज येथे रवाना करत त्या ठिकाणची संपूर्ण माहिती घेऊन समजूत घालण्याचा प्रयत्न करण्यासाठी पाठवले. त्या ठिकाणी झालेल्या चर्चेचा निरोप घेऊन नुकतेच महाजन हे फडवणीसांकडे तसेच बावनकुळे यांची भेट घेऊन माहिती देणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय दादांची नाराजी ही परवडणारी नाही असेही यावेळी महाजन म्हणाले.

मोहिते यांनी सध्याची परिस्थिती पाहता शांत बसणे पसंत केले असते तर येणाऱ्या काळात जिल्ह्याच नव्हे तर माळशिरस मतदारसंघातही मोहिते विरोधकांची ताकद वाढली असती. मुळातच आजच्या या भूमिकेमुळे पुन्हा एकदा कार्यकर्त्यांमध्ये असलेले प्रेम दिसून आले. तर कोणत्या पक्षाशिवाय मोहिते हेच आपला पक्ष असल्याचेही कार्यकर्त्यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भाजपा कोणती भूमिका घेते याकडे लक्ष लागून राहील. पण मोहितेंनी सोडलेला बाण माघारी कसा घेणार हा मोठा प्रश्न आहे. कार्यकर्त्यानी सदरची निवडणुक हातात घेतली आहे. आणि मोहितेंनी सगळा निर्णय कार्यकर्त्यांवर सोडला आहे. त्यामुळे पुढे जे घडेल ते महाआघाडीच्या हिताचे घडेल असे दिसुन येत आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE