दरोड्याचा बनाव करीत घरात घुसलेल्या हल्लेखोरांकडुन महिलेवर हल्ला ; महिला ठार
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यातील पोंधवडी येथील एका २३ वर्षीय महिलेचा निर्घृण खून करण्यात आला आहे. सदरची घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास पोंधवडी राजुरी रस्त्यावरील वस्तीवर घडली आहे. महिलेवर धारदार शस्त्राने हल्ला करीत हिचा खून करण्यात आला आहे. तिला एक लहान मुल असून मागील तीन वर्षांपासून ती माहेरीच राहत होती.

कोमल बिभीषण मत्रे वय २३ असे मयत महिलेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कोमलचा विवाह गावातीलच मत्रे कुटुंबात झाला होता. मागील तीन वर्षापासून कौटुंबिक कलहातून ती माहेरीच राहत होती. मंगळवारी रात्री काही अज्ञात खाल्लेखोर कोमलच्या घरी आले. सुरुवातीला त्यांनी दरोड्याचा बनाव केला व जाताना कोमल हिच्यावर निर्घृण पणे धारदार शस्त्राने हल्ला केला. त्या हल्ल्यात ती जागीच ठार झाली.

सदरच्या ठिकाणाहून पळून जात असताना हल्लेखोरांच्या ताब्यात असलेली मोटरसायकल पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यामुळे हल्लेखोर लवकरच मिळून येण्याची शक्यता आहे. घटनास्थळी पोलीस पोहचले व तात्काळ तपास सुरू केला होता. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित शिंदे, पोलीस उपनिरीक्षक श्री दळवी, हवलदार बालाजी घोरपडे, अझर शेख यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली आहे.