सोशल मिडीयातील युवकांच्या विरोधानंतर किराणा दुकानदारांचा बंद मागे ; आजपासुन सर्वच दुकाने झाली खुली
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यातील किराणा व्यापाऱ्यांनी घोषित केलेला बंद अखेर मागे घेण्यात आला असून सर्व दुकानदारांनी आपली दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला असल्याबाबत दिसून येत आहे. शहरातील बऱ्याच दुकानदारांनी आपला आज किरणात दुकानांचा बंद मागे घेऊन दुकाने उघडली आहेत. मागील चार ते पाच दिवसांपासून सोशल मीडिया मधून किराणा बंदला विरोध केला जात होता. त्या पार्श्वभूमीवर विविध संघटनांनी करमाळा जागरूक नागरिक या समूहाला हा पाठिंबा दिला होता. शहरातील हॉटेल व सोने चांदी व्यापारी संघटना तसेच इतर अनेक संघटनांनी पाठिंबा दर्शवला होता.

शहरातील कोरोना संख्या वाढत चाललेली असल्यामुळे बंद केले पाहिजे असे आवाहन करीत किराणा दुकानदारांनी बंद पुकारला होता. तो बंद दिनांक 10 ते दिनांक 16 पर्यंत असलेबाबत सोशल माध्यमातून कळवण्यात आले होते. पण बंद च्या माध्यमातून प्रश्न सुटत नाही अनेकांचा रोजगार बुडतो व उपासमारीची वेळ येते असे पटवून देण्यासाठी शहरातील युवक समोर आले व सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना जागृत करत शहरातील सर्व व्यापाऱ्यांना सुरू ठेवण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील हॉटेल असोसिएशन, ग्राहक पंचायत, सोने चांदी व्यापारी संघटना, कापड व्यापारी व इतर छोटे मोठ्या व्यापारी संघटनांनी जागरूक नागरिक या तात्पुरत्या स्वरूपात निर्माण झालेल्या ग्रुप ला पाठिंबा दर्शवला होता. व बंदच्या घोषित पहिल्याच दिवशी सर्वांनी दुकानेही उघडे ठेवली होती. फक्त किराणा दुकाने बंद असल्याने सोशल माध्यमातून किराणा दुकानदारांवर रोषही व्यक्त केला जात होता. तर काहीजण कारवाईच्या मागणीचा तयारीत होते.

यासाठी दिले होते निवेदन
किराणा व्यापाऱ्यांनी बंद पुकारल्यानंतर ग्राहक पंचायतीचे महाराष्ट्र राज्य सचिव भालचंद्र पाठक सर यांनीही तहसिलदार यांनी किराणा व्यापाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली होती. त्यामुळेच अखेर किराणा दुकानदारांनी माघार घेत बंद मागे घेत दुकाने खुली केली आहेत.