करमाळा बसचा ब्रेक निकामी गाडी झाडावर आदळली ; एक महिला जखमी
करमाळा समाचार
करमाळा शेळगाव एसटी बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे सदरची गाडी ही घारगाव येथे जिल्हा परिषद शाळेच्या बाजूला असलेल्या झाडाला जाऊन धडकली आहे. चालकाच्या प्रसंगावधानाने वेळेत गाडी झाडाकडे वळवल्याने कोणतीही जीवीतहानी झाली नाही. सदरचा अपघात शनिवारी दुपारी साडे पाचच्या दरम्यान घारगाव येथे घडला आहे.

करमाळा – शेळगाव ता. परांडा या ठिकाणी दुपारी साडेचारच्या सुमारास गेलेली बस (क्रमांक एम.एच. ११ बी. एल. ९४७२) माघारी येत असताना त्यामध्ये पाच ते सहा प्रवासी होते. जवळपास साडेपाचच्या सुमारास घारगाव येथे आल्यानंतर गाडीत बिघाड झाल्याचे चालकाला लक्षात आले. यावेळी बसचे चालक नवनाथ जाधव यांनी प्रसंगावधान राखत गाडी झाडाकडे वळवली. त्या ठिकाणी जाऊन गाडी धडकल्यानंतर गाडीतील एक महिला जखमी झाली आहे. तिला तात्काळ दवाखान्यात पाठवण्यात आले.

सदरचा अपघात शनिवारी झाल्याने शाळा सकाळची होती. त्यामुळे शाळा परिसरात विद्यार्थी नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. त्याशिवाय ज्या झाडाला जाऊन आदळली त्या ठिकाणी ग्रामस्थ कट्ट्यावर बसून असतात पण अपघातावेळी त्या ठिकाणी कोणीही नसल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. चालकासह इतर प्रवासी सुखरूप असल्याचे माहिती देण्यात आली आहे.
पण करमाळा आगारात कधी सुधारणा होईल असा प्रश्न उपस्थित होत आहे. चालकाने सध्यातरी निभावले अपघात मोठा झाला असता आणि जीवितहानी झाली असती तर याला जबाबदार कोण ? आता तरी खराब गाड्या बंद होतील का आगार प्रमुखांनी जबाबदारी घेतली पाहिजे.