गटविकास अधिकाऱ्यांवर शाईफेक प्रकरण ; आंदोलनकर्ते आज हजर होण्याची शक्यता
करमाळा समाचार
प्रभारी गटविकास अधिकारी राजाराम भोंग यांच्या अंगावर शाई फेक केल्यानंतर जेऊर येथील तीन आंदोलनकर्त्यांवर शासकीय कामकाजात अडथळा दाखल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता ते अजुन फरार आहेत.


जेऊर ग्रामपंचायत येथे असलेल्या विविध कामांच्या तक्रारीवरून आंदोलनकर्ते बालाजी गावडे व बाळासाहेब कर्चे यांनी आक्रमक पाऊल उचलत पहिल्यांदा इशारा दिला होता. त्यानंतर अचानक चर्चा सुरू असताना गटविकास अधिकारी यांच्या अंगावर काळी शाई फेकली होती. याबाबत गटविकास अधिकाऱ्यांनी पोलिसात तक्रार दिल्यावर या दोघांसह एका अनोळखीवर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून ते सर्व फरार आहेत.
सत्र न्यायालयातील जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी अर्ज केला होता. परंतु त्या ठिकाणचा अर्ज स्वतःहून माघार घेतल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता त्यांना हजर राहण्याशिवाय पर्याय राहिला नसल्याने आज किंवा उद्या ते हजर होऊ शकतात. या संदर्भात त्यांच्या एका निवडवर्तीयाने माहीती दिली की, आंदोलनकर्ते वैयक्तिक विषयासाठी लढत होते असे नाही ते गावकऱ्यांसाठी लढत असल्याने त्यांना न्याय मिळेल.