मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २५ डिसेंबरला करमाळा तालुक्यात ; जिल्हाध्यक्ष महेश चिवटेंची माहीती
करमाळा समाचार
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे करमाळा तालुक्यात लवकरच येणार आहेत. दिनांक 25 रोजी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या मोळी टाकण्याच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते सदरची मोळी टाकण्याचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. यावेळी महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख शिंदे गट महेश चिवटे यांनी दिली आहे.

मागील तीन वर्षांपासून आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा बंद अवस्थेत होता. कामगार तसेच इतर देणी वाढल्याने कारखाना बंद करण्याची वेळ ही आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर आली होती. दरम्यानच्या काळात आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा भाडेतत्त्वावर देण्याचा ठराव करण्यात आला होता. सदर ठरावात पवार यांनी लक्ष घालून हा कारखाना भाडेतत्त्वावर घेण्याचे नियोजन केले होते. या संदर्भात सर्व कार्यवाही पूर्ण झाली होती. परंतु एनसीडीसी बँकेने त्यात विरोध दर्शवल्याने कारखाना सुरू होण्याची प्रक्रिया थांबली होती.

त्यानंतर सत्ता बदल झाला व भाजपा व शिंदे सरकार सत्तेत आले. त्यानंतर मंत्री तानाजी सावंत यांनी सदरच्या कारखान्यात दिलेला शब्द पूर्ण करण्याच्या हेतूने लक्ष घातले व कारखाना सुरू करण्यासाठी पावले उचलण्यासाठी सुरुवात केली. या वेळी सभासदांनी ही कारखाना हा भाडेतत्त्वावर न देता सहकारी तत्त्वावर चालला पाहिजे ही भूमिका घेतल्याने अखेर कारखाना हा सहकारी तत्त्वावर सुरू करण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यानुसार बँकेने दिलेल्या शर्ती व अटीनुसार काही रक्कम भरून कारखाना सुरू करण्याची परवानगी मिळाली.
सदरची रक्कम जुळवाजुळी करताना सभासद व इतरांकडे सहकार्य मागितले जात होते. त्यामध्ये मोलाचा वाटा हा मंत्री तानाजी सावंत यांनी उचलला व मोठी रक्कम ही कारखान्याला चालू करण्यासाठी सहकार्य म्हणून देऊ केली. कारखान्यावर बागल गटाची सत्ता आहे. तर कारखाना सुरू करण्यासाठी माजी आमदार नारायण पाटील यांनीही जोरदार ताकद लावली होती. या पार्श्वभूमीवर आता कारखाना सुरू होत आहे. मोळी टाकण्याचा कार्यक्रम हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठेवण्यात आला आहे . त्या निमित्ताने ते पंचवीस रोजी करमाळ्यात येत आहेत.