करमाळासोलापूर जिल्हा

मकाई कारखान्याच्या निवडणुकीत मोहिते पाटील समर्थकांची उडी ? ; आज जेऊर येथे फैसला

करमाळा समाचार

आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी.. मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत झोळ आणि बागल यांच्यात लढत होणार असे निश्चित असतानाच आता यात मोहिते पाटील समर्थक  आता लक्ष घालणार असल्याची खात्रीलायक वृत्त करमाळा समाचारच्या हाती आले आहे. रात्री उशिरापर्यंत मोहिते पाटील समर्थक एकत्र येऊन मकाई कारखाना निवडणूक लढण्यावर एकमत झाल्याची माहिती मिळत आहे. यामुळे आता मकाईचे निवडणूक रंगतदार अवस्थेत जाऊन पोहोचणार हे नक्की आहे.

सुरुवातीपासूनच कोणत्याच मोठ्या गटाने मकाईच्या निवडणुकीत लक्ष न घातल्यामुळे झोळ व बागल अशी लढत दिसून येत होती. परंतु आता मोहिते पाटील गटाने यात लक्ष घातल्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. मोहिते पाटील गटाच्या समर्थक नेत्या सवितादेवी राजेभोसले यांच्या नेतृत्वाखाली सदरचा पॅनल उभा राहणार असल्याचे समजते आहे. रात्री उशीरा पर्यंत झालेल्या बैठकीत आज शेवटच्या दिवशी सर्व पॅनलचे अर्ज दाखल होतील अशी माहिती आहे.

मोहिते पाटील समर्थकांनी माजी आमदार नारायण पाटील यांचीही भेट घेणार आहेत. तर पुढील रणनीती ठरवण्यासाठी आज सकाळी दहाच्या सुमारास जेऊर येथे समर्थकासोबत बैठक होऊन पुढील रणनीती ठरवली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे मोहिते पाटील समर्थकांनी घेतलेल्या या निर्णयामुळे पुढे झोळ व बागल यांच्या भूमिकेकडे लक्ष राहील.

मागील काही दिवसांपासून सर्व काही शांत सुरू होते. यामध्ये बागल विरुद्ध झोळ अशी लढत सुरु होती. झोळ यांनी विरोधी गट एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले होते. परंतु मोठा गट यात दिसून येत नव्हता. पण शांत असलेले वातावरण हे एका मोठ्या वादळाकडे जाणार आहे असा कोणी विचारही केला नसेल पण आता मोहिते पाटील समर्थक यात लक्ष घालणार असल्याने याबाबत अकलूज येथे बैठका झाल्याबाबत माहिती समोर येत आहे. त्यामुळे मोहिते पाटील यांच्या पाठिंब्यावर तालुक्यातील सर्व समर्थक बागलांना टक्कर देण्यासाठी संपूर्ण पॅनल अखेरच्या दिवशी उभा करून मोठा धमाका करणार असल्याचे दिसत आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE