करमाळ्यात निर्बधात शिथिलते बाबत नागरीकात सभ्रम ; तहसिलदार समीर माने म्हणाले …
करमाळा समाचार
करमाळासह 5 तालुक्यांमध्ये जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी कडक निर्बंध लागू केल्यानंतर शनिवार व रविवारी पूर्णपणे बंद पाहायला मिळाले. काल स्वातंत्र्य दिना दिवशी ही सर्वांनी दुकाने बंद ठेवून प्रशासनाला सहकार्य केल्याचे आढळून आले. तर करमाळा तालुक्यात अनेकांमध्ये गैरसमज पसरवला जात असल्याचेही दिसून आले. सोमवारपासून सर्व दुकाने खुली होत आहेत अशी अफवा सध्या सर्वत्र पसरलेली आहे. पण तहसीलदार समीर माने यांनी या चर्चेला पूर्णविराम देत अशी कोणतीही सवलत देण्यात आली नसल्याचे जाहीर केले आहे.

सोलापूर जिल्ह्यात करमाळा सह पाच तालुक्यात कडक निर्बंध लागू केल्यानंतर प्रत्येक तालुक्यातील व्यापाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. यासंदर्भात अनेक आंदोलने व इशारे दिल्यानंतर जिल्हाधिकारी शंभरकर यांच्यासोबत बैठकाही झाल्या. परंतु त्याचा काही परिणाम झालेला दिसून येत नाही. आजही निर्बंध जसेच्यातसे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला दिसून येतो.

दुकाने उघडण्यासाठी वेळेची बंधने घालून परवानगी द्यावी असे व्यापाऱ्यांचे म्हणणे असून त्यात काही प्रमाणात शिथिलता येण्याची शक्यता होती. परंतु त्या संदर्भात अद्याप तरी कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. तरी नागरिकांनी प्रशासनाच्या सोबत समन्वय साधून दुकाने उघडावी किंवा नाही याचा निर्णय घ्यावा. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवण्यापूर्वी संपूर्ण माहिती घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.