करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

मोबाईल वरुन व्यवहार ; जेऊरच्या कापड दुकानदाराला ९२ हजारांचा गंडा

करमाळा समाचार

अनोळखी व्यक्तीने मोबाईलवर संपर्क साधून आपण कापड व्यापारी असल्याचे भासवले व मोबाईलवरूनच झालेल्या व्यवहारातून जेऊर येथील व्यापाऱ्याची ९२ हजार ८०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा प्रकार हा २५ जून ते एक जुलै पर्यंत घडला आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर करमाळा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.

याप्रकरणी धनेश्वर कबाडी (७९७५६२७८३४ या क्रमांकावरून) फोन करणारा व्यक्ती याच्यावर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जेऊर येथील कापड दुकानदार स्वप्निल भैरु शिंदे वय २९ रा. वांगी क्रमांक तीन यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, स्वप्निल भैरु शिंदे यांचे जेऊर येथे गुरुदत्त स्पोर्ट या नावाने कपड्याचे दुकान आहे. २५ जून रोजी ते दुकानात असताना त्यांना संबंधित मोबाईल नंबर वरून फोन आला व त्यांनी स्वतःचे नाव धनेश्वर कबाडी असे सांगितले, ते श्रीनिवास एपेरिअल नावाची कंपनी तिरुपर, तामिळनाडू येथे व्यवस्थापक म्हणून काम करत असल्याचे सांगितले. तसेच आपण स्पोर्ट कपडे तयार करतो व अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर या ठिकाणी माल देतो असे सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर मोबाईलवर कपड्याचे फोटो पाठवून ऑर्डर स्वीकारली व ९२ हजार ८०० रुपयाची बिल पाठवून दिले.

त्यानंतर व्यापारी म्हणून सांगत असलेल्या व्यक्तीने अकाउंट नंबर पाठवले त्यावर ९२ हजार ८०० रुपये पाठवण्यास सांगितले. शिंदे यांनी वेगवेगळ्या दिवशी सदरची रक्कम संबंधित व्यक्तीच्या अकाउंटवर पाठवली आहे. त्यानंतर त्यांनी कपडे पाठवण्यास सांगितल्यानंतरही बरेच दिवस झाले तरी कपडे ऑर्डर पाठवली नाही. त्यामुळे त्याचा संपर्क केला त्यावेळी त्यांनी माल पाठवता येणार नाही, तुमचे पैसे परत देतो असे सांगितले. वारंवार त्याला फोन केले पण पुन्हा त्याने फोन उचलले नाहीत व पैसेही पाठवले नाहीत.

त्यावरून धनेश्वर कबाडी असे नाव सांगितलेल्या व्यक्तीकडून फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर करमाळा पोलीस ठाण्यात संबंधित व्यक्तीच्या विरोधात तक्रार देण्यात आली. यावरून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी बंडगर हे पुढील तपास करीत आहेत.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE