आ. रोहित पवारांचे ८० व्या वाढदिवसानिमीत्त शरद पवारांना पत्र पत्राद्वारे आपल्या आजोबांना घातली भावनिक साद
करमाळा समाचार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमीत्त कर्जत जामखेडचे आमदार रोहित दादा पवार यांनी भेटस्वरूपात एक पत्र दिले आहे. या तीन पानी पत्रात त्यांनी आपले आजोबा शरद पवार यांना भावनिक साद घातली आहे. राजकीय, सामाजिक आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यातील साहेबांसोबतचे अनेक किस्से रोहित पवार यांनी या पत्राद्वारे मांडले आहे. तसेच रोहित पवार यांनी आपल्या आजोबांसोबतच्या अनेक आठवणींना या पत्रातून उजाळा दिला आहे.

शरद पवार यांना लिहीलेल्या या पत्राद्वारे आ. रोहित पवार यांनी एक विनंती देखील केली आहे. यामध्ये ते म्हणतात, ”तुमच्याकडं दांडगा अनुभव आहे. मी माझ्या कामानिमित्त बऱ्याचदा तरुणांना भेटत असतो, त्यामुळं त्यांच्या अपेक्षा मला माहित आहेत. आपल्या दांडग्या अनुभवाची शिदोरी आज या तरूण वर्गाला शिकण्यासाठी हवीय. मग ती लेखाच्या अथवा पुस्तकाच्या माध्यमातून असो किंवा तरुणांसोबत संवाद साधण्याच्या एखाद्या कार्यक्रमाच्या माध्यमातून असो, आपण ती द्यावी, अशी या तरुण वर्गाचा एक प्रतिनिधी म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे.” अशा भावना आ. रोहित पवार यांनी मांडल्या आहेत. आज सकाळी मुंबई येथे आ.रोहित पवार यांनी हे पत्र शरद पवार यांना त्यांच्या ८० व्या वाढदिवसानिमीत्त भेट स्वरूपात देत शुभेच्छा दिल्या.
