बागलांचे निवासस्थान असल्याने मुद्दाम काम रखडवलय ? ; उलटसुलट चर्चाना उधान नागरीक धुळीने हैराण
करमाळा समाचार
करमाळा शहरा लगत असलेल्या दत्त मंदिर ते न्यायालय रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे. त्यामुळे धुळीचे लोट एवढ्या मोठ्या प्रमाणावर उठत आहेत की लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे वृद्धांसह बालकांना श्वसनाचे आजार उद्भवू शकतात. तर स्थानीक नागरीकांना येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणावर श्वसनाचे रोग होऊ शकतात. त्यामुळे वेळीच या रस्त्यावर योग्य त्या उपाययोजना कराव्यात अन्यथा या रस्त्यावरील वाहतूक बंद करावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सदर रस्त्यावर महाविद्यालय न्यायालय शासकीय कार्यालयांच्या रस्ता असल्याने मोठ्या प्रमाणावर आवक-जावक असते.

दत्त मंदिर ते न्यायालय सदरच्या रस्त्याची जबाबदारी घेण्यास कोणतेच कार्यालय तयार नव्हते. तात्पुरती डागडूजी करून सदरचे काम चलाऊ धोरण हे राबवले जात आहे. परंतु शाळेचे विद्यार्थी, न्यायालयात कामकाजासाठी येणारे वकील, न्यायाधीश यांच्या आरोग्याशिवाय परिसरात कायमस्वरूपी राहणाऱ्या लोकांचे श्वसनाचे आजार उद्भवू शकतात. याची पुसटशीही कल्पना संबंधित विभागांनाही नाही. याबाबत अनेकदा विविध संघटना, नेते, पदाधिकारी यांनी तक्रारी करून सुद्धा यात कोणत्याच उपाय योजना राबवल्या जात नाहीत.

याच परिसरात माजी आमदार शामल बागल यांचेही कार्यालय असून मुद्दामहून त्या परिसरात काम केले जात नसल्याच्या ही चर्चा आहेत. त्यामुळे नेमके हे काम कोणा अडवत आहे. हा त्रास कोणाला व्हावा म्हणून हे काम रखडले जात आहे. याचा अद्याप तपास लागलेला नसला तरी अंतर्गत वादांमुळे स्थानिक नागरिकांना याचा दुष्परिणामांना सामोरे जावे लागत आहे. त्यातून न्यायाधीश, वकीलही सुटलेले नाहीत. सदरचा रस्ता आमच्या विभागाकडे येत नसल्याचे सांगून पंचायत समिती बांधकाम विभागाने हात झटकले होते. पण काही दिवसापूर्वी त्या ठिकाणी निधी मंजुर झाल्यानंतर काम करण्याची तयारी पंचायत समितीने दर्शवली आहे. पण निधी उपलब्ध होत नसल्याने कामाला सुरुवात झाली नसल्याचेही सांगण्यात आले.
जिल्हा परिषद १५ वा वित्त आयोग जिल्हा परिषद मंजुर पण निधी प्राप्त नाही. त्यामुळे सदरचे काम होऊ शकले नाही मागील दोन महिण्यापासुन संबंधित विभागाला निधी प्राप्त झाला नाही. सदरच्या कामासाठी २५ लाखांचा निधी मंजुर केला आहे.
– मनोज राऊत, गटविकास अधिकारी