उपमुख्यमंत्री अजितदादा व आ. रणजीतदादा यांची मुंबईत भेट ; भेटीनंतर कशी असणार समीकरणे ?
करमाळा समाचार
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची नुकतीच भाजपाचे आमदार रणजीत दादा मोहिते पाटील यांनी भेट घेतलेली समोर आले आहे. राष्ट्रवादीत अजित पवार यांच्यामुळे नाराज होऊन ज्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता असे महाराष्ट्राचे नेते म्हणून मोहिते पाटील यांच्या विषयी चर्चा होती. पण घडामोडी वेगाने बदलत आहेत. आज दुपारी आ. रणजीत दादा मोहिते पाटील यांनी भेट घेऊन अजितदादा यांना शुभेच्छा दिल्या आहेत.तर सरकारमध्ये आल्यामुळे स्वागतही केले आहे.

कामकाज सल्लागार समीती बैठक असताना आज विधानभवन मुंबई भेट झाली. यावेळी ते दोघे एकत्र आले होते. सदर बैठकीमध्ये इतर नेतेमंडळी ही उपस्थित होते. यावेळी या दोघांनी सोबत फोटो काढल्यानंतर तो फोटो सध्या सोशल माध्यमातून व्हायरल होत आहे. त्यामुळे अनेकांच्या भोवया उंचावल्याशिवाय राहणार नाहीत.

या भेटीनंतर आता सोलापूर जिल्ह्यातही दोन्ही गट एकत्र काम करतील का ? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. करमाळ्यात मोहिते पाटील समर्थक हे माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या सोबत आहेत. तर अजित दादा यांचे कट्टर समर्थक आमदार संजय मामा शिंदे यांचे व मोहिते पाटील यांचे संबंध टोकाच्या विरोधाचे राहिले आहेत. त्याशिवाय नारायण पाटील व संजय मामा शिंदे हे कट्टर विरोधक आहेत. वरिष्ठ पातळीवर नेते मंडळी एकत्र आल्यानंतर आता तालुका पातळीवरचे राजकारण कशा पद्धतीने होईल याकडे लक्ष लागून राहणार आहे.