उजनी धरणात येणारा विसर्ग दहा हजार ; तर जाणारा 1000
करमाळा समाचार – संजय साखरे

सोलापूर जिल्ह्यासह नगर आणि पुणे जिल्ह्याला वरदायिनी ठरलेल्या उजनी धरणात पाण्याची आवक वाढली असून आज सकाळी दौंड येथून उजनी धरणात १०६९४ क्यूसेक एवढा विसर्ग येत आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत उजनी धरण यावर्षी एक महिना अगोदर मायनस मध्ये गेल्याने उजनी धरणातील पाणीसाठा कमी झाला होता. याशिवाय आषाढी वारी व सोलापूरला पिण्यासाठी 21 तारखेला उजनी धरणातून पाणी सोडल्याने उजनी धरणातील पाणीसाठा सुरू झाला होता.
त्यामुळे उजनी काठचा शेतकरी धास्तावला होता. याशिवाय शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांना सुद्धा अडचणी निर्माण झाल्या होत्या. मागील ४८ तासात भीमा खोऱ्यातील अनेक धरणावर चांगला पाऊस नोंदला गेला असल्याने धरणात येणाऱ्या पाण्यात वाढ झाली आहे. सध्या उजनी धरणात दौंड येथून १०६९४ क्यूसेक एवढा विसर्ग येत आहे. उजनी धरणातून भीमा नदी पात्रात १००० क्युसेक एवढा विसर्ग सोडण्यात येत आहे. गेले काही दिवस दडी मारलेला पाऊस आता सक्रिय झाल्याने धरणातील पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.
