जिल्हा नियोजन मंडळातून करमाळा तालुक्याला दोन कोटी निधी मंजूर
प्रतिनिधी – करमाळा
जिल्हा नियोजन मंडळाच्या 2020- 21 मधून करमाळा तालुक्यासाठी तीर्थक्षेत्र विकास ,जनसुविधा व नागरी सुविधा योजनेअंतर्गत 2 कोटी निधी मंजूर झाला असून या माध्यमातून तालुक्यातील 70 गावांना निधी देण्यात आला असल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली. नागरी सुविधा योजनेमधून कंदर, चिखलठाण, कूर्डू व भोसे येथील अंतर्गत रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येणार असून वीट गावांमध्ये अंतर्गत विद्युतीकरण करण्यात येणार आहे.

जनसुविधा योजने मधून कंदर, भोसे, केम, सातोली, जातेगाव, पाडळी, निमगाव, करंजे इत्यादी गावांमध्ये दफनभूमी वॉल कंपाऊंड बांधणे, ग्रामपंचायत कार्यालयाचे विस्तारीकरण करणे, रस्ता खडीकरण करणे, ग्रामपंचायत इमारत व परिसर सुशोभिकरण करणे ,वस्ती रस्ता मुरमीकरण करणे, स्मशानभूमीमध्ये पेविंग ब्लॉक बसविणे, दफनभूमी शेड व परिसर यांना सिमेंट काँक्रीट करणे इत्यादी कामे केली जाणार आहेत.
तीर्थक्षेत्र विकास योजनेमधून पांगरे, सरपडोह, पोमलवाडी , केतुर, वांगी नंबर 1, निंभोरे, साडे , टाकळी इत्यादी गावांमध्ये ग्रामदैवत मंदिरासमोर पेविंग ब्लॉक बसविणे, संरक्षक भिंत बांधणे, दर्शन मंडप बांधणे, भक्तनिवास बांधणे, वाहनतळ करणे, अन्नक्षेत्र बांधणे, शौचालय बांधणे इत्यादी कामे केली जाणार आहेत. गावाच्या विकासासाठी आवश्यक असणारा निधी जिल्हा नियोजन मंडळातून उपलब्ध झाल्यामुळे गावातील समस्या संपण्यास मदत होणार आहे.
