नियुक्ती होण्यापूर्वीच ‘त्यांना’ संभाव्य प्रशासक मंडळातून “डच्चू” ? नियम काय सांगतात ..
करमाळा समाचार
आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासक मंडळामध्ये नियुक्ती करण्यासाठी काही नियमावली आहे. त्यानुसार जर संबंधित व्यक्ती हा त्या नियमाप्रमाणे पात्र नसेल तर त्याची नियुक्ती प्रशासक मंडळात होऊ शकत नाही. त्यामुळे काही जणांची नियुक्ती होण्यापूर्वीच त्यांना या प्रशासक मंडळातून “डच्चू” मिळणार हे नक्की झाले आहे. सध्या तरी संभाव्य प्रशासक मंडळातून अजूनही कोणतीही नाव जाहीर झाले नसले तरी पडद्याआड चाललेल्या हालचालीतुन माहीती मिळत आहे. विशेष म्हणजे या सगळ्या गोष्टी गोपणीय पद्धतीने सुरु आहेत. जर करायचेच असेल तर उघडपणे का केले जात नसावे असा प्रश्न पडत आहे.
आदिनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये प्रशासक मंडळ नेमण्यासाठी चार नाव सुचवण्यात येणार होती. त्यामध्ये नियमावली प्रमाणे सदरची नावे पाठवली जाणारही होती. पण नियमाच्या बंधनात अडकुन यातून दोन नावे कमी झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता प्रशासक मंडळाच्या माध्यमातून केवळ दोन पदाधिकारी काम करण्याची शक्यता आहे किंवा यात बदल होऊन नावे वाढवलीही जातील. यासंदर्भात साखर संचालक राजेंद्रजी दराड यांच्याशी संपर्क साधला असता असे कोणते पत्र आले नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. तरीही सदरच्या घडामोडी सुरु असल्याची चर्चा आहे.
अशी आहे नियमावली…
आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संभाव्य प्रशासक मंडळात सहभागी होण्यासाठी तो संस्थेचा सभासद नसला तरी चालतो पण संबंधित व्यक्ती कार्यक्षेत्रातील असावी, कोणत्याही सहकारी संस्थेचा देणीदार नसावा, त्या अनुषंगाने कोणती करवाई झालेली नसावी, करार करण्यास पात्र असावा अशा नियमाप्रमाणे त्याची नियुक्ती बंधनकारक असते असे नियम पुर्तता होत असेल असे पदाधिकारी तिथे काम करताना दिसतील.
पण खरच गरज आहे का ?
ऊस उत्पादक शेतकरी हा संचालक मंडळाच्या भरोशावर सदरच्या कारखान्याला ऊस घालत असतो. परंतु कारखाना सध्या अडचणीत असताना त्यावर प्रशासक नेमण्यात आले आहे. प्रशासकाने लवकरात लवकर उर्वरित रक्कम भरून आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लावणे अपेक्षित होते. परंतु आता सध्या प्रशासक मंडळाच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे शेतकरी कारखान्याला ऊस घालेल का ? हाच मुळात प्रश्न आहे. त्यामुळे येणारा हंगाम हा आदिनाथ साठी अडचणीचा ठरू शकतो. त्यामुळे निवडणुका घेण्याऐवजी प्रशासक मंडळ उभा करून कारखाना चालवणे योग्य आहे का ? खरंच याची गरज आहे का ? हा प्रश्न सध्या विचारला जात आहे.