उद्याचा निकाल बाजुने लागला तरी पेच कायम ? ; राजेभोसले – झोळ यांच्या भुमिकेकडे लक्ष
करमाळा समाचार
मकाई सहकारी साखर कारखान्याच्या 75 पैकी 36 अर्जांवर आक्षेप घेण्यात आला आहे. सदर हरकतींवरील सुनावणी पूर्ण झालेली आहे. मात्र त्यावरील निर्णय हा सोमवारी दिला जाणार आहे. सुरुवातीला बागल गटाच्या विरोधात उभा ठाकलेले प्रा. रामदास झोळ यांनी आपण पूर्ण ताकदीशी लढणार आहोत अशी पहिलेच स्पष्ट केले आहे. तर त्यानंतर मोहिते पाटील समर्थक नेत्या सवितादेवी राजेभोसले यांनीही मैदानात उतरून दोन हात करायचे ठरवले आहे. परंतु दोन्ही गट वेगवेगळे लढणार असल्याचे दिसून येते.

मकाईच्या रणसंग्रामात सर्व विरोधक व सत्ताधारी पूर्ण ताकदीनिशी उतरलेले असले तरी सर्वांचे लक्ष हे उद्या जाहीर होणाऱ्या निकालांवर आहे. मागील काही निकाल पाहता छोट्या-मोठ्या चुकांना सावरले जाते व उमेदवाराला निवडणूक लढवण्याची संधी दिली जाते असे पाहण्यात आले आहे. ज्या त्या वेळी काम पाहत असलेल्या अधिकाऱ्यांवरही बरेचश्या सवलती व अडचणी अवलंबुन असतात. तसेच निवडणुक लढण्यासाठी सर्वात महत्त्वाची अट म्हणजे तीन वर्षे ऊस कारखान्याकडे दिलेला असावा, तीन आपत्य व मकाई सहकारी साखर कारखान्याकडे कोणतीही थकबाकी नसली पाहिजे. या महत्त्वाच्या बाबींचे पालन केले असेल तर उमेदवाराकडे सहानुभूतीने पाहिले जाऊ शकते व आदिनाथ मध्ये थकीत असलेल्या शेअर बाबत दिलासा मिळू शकतो असा अंदाज सहकार क्षेत्रात काम करणारे विश्लेषक मांडत आहेत.

जवळपास निम्म्या सदस्यांवर या ठिकाणी आक्षेप घेण्यात आलेला आहे. त्यापैकी किती मंजूर होतात याकडे लक्ष लागून राहिले आहे. तर बागल गटाच्या विरोधात मैदानात उतरलेले राजेभोसले व झोळ हे वेगवेगळ्या निवडणुका लढवण्यावर ठाम राहीले तर त्यांच्या मतांमध्ये विभागणी होणे शक्य आहे. शिवाय मंजूर होऊन किती अर्ज पात्र होतात त्यावरही दोन्ही गटात उमेदवार जवळ करण्यावरून रस्सीखेच होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर दोन्ही एकत्र आले तर त्यात कशापद्धतीने वाटाघाटी केली जातील त्यात ते समाधानी होतील का ?
मोहिते पाटील समर्थक पॅनल समोर येण्यापूर्वी बरेचसे उमेदवार हे प्राध्यापक रामदास झोळ यांच्या संपर्कात होते. मात्र ज्यावेळी सवितादेवी राजेभोसले यांच्या नेतृत्वाखाली पॅनल जाहीर होणार आहे अशी माहिती मिळाली त्यावेळी बरेचसे नेते व उमेदवार राजेभोसले यांच्या संपर्कात आल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे गोपणीय माहीती अशी आहे की जे लोक पहिल्या बैठकीत झोळ यांच्यासोबत होते ते माजी आमदार नारायण पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीला राजेभोसले यांच्यासह हजर होते. त्यामुळे ज्या समर्थकांवर विश्वास ठेवून प्राध्यापक झोळ हे मैदानात उतरले होते ते समर्थक त्यांच्यासोबत शेवटपर्यंत दिसतील का ? हा मोठा प्रश्न आहे.
त्यामुळे उद्याचा निकाल लागल्यानंतर पात्र आणि अपात्र यादी समोर आल्यानंतरच नेमके झोळ गट व भोसले राजेभोसले गटात किती लोक जातात, यावर संपूर्ण पॅनल कोणता उभा राहू शकतो व त्यापैकी कोणता उमेदवार कोणाच्या पराभवास जबाबदार ठरेल हे येणारा काळच ठरवेल, परंतु सत्ताधाऱ्यांच्या विरोधात उभा ठाकलेल्या या दोन्ही गटांनी वेळीच नरमाई न दाखवल्यास अडचणींचा सामना करावा लागू शकतो. सदरची बाब ही सत्ताधारी गटाला फायद्याची ठरू शकेल.