संतापदायक : करमाळा तालुक्यात बिबट्यासदृश प्राण्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा बळी ; वनविभागाच्या वेळखाऊ कामावर नागरीकांचा संताप
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यात बिबट्या सदृश्य हिंसक प्राण्याने तालुक्यातील लिंबेवाडी येथील कल्याण या युवा शेतकऱ्याचा बळी घेतला आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास लिंबेवाडी शिवारात घडली आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण तर झालेच आहे. पण मागील काही दिवसांपासून बिबट्या सदृश प्राणी तालुक्यात फिरत असल्याबाबत तक्रारी केलेल्या असतानाही वन विभागाने दुर्लक्ष केल्याने लोकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. सदर घटनास्थळी करमाळा तालुक्याचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांनी भेट दिली आहे. पुढील पोलीस कारवाई सुरू आहे.


लिंबेवाडी तालुका करमाळा येथील कल्याण फुंदे वय 40 हे शेतीत पिकांना पाणी देण्यासाठी गेले असताना सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांच्यावर बिबट्या सदृश जंगली प्राण्यांने हल्ला केला व त्यांचे शीर धडापासून वेगळे केले आहे. सायंकाळी उशिरापर्यंत घरी न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध केली असता घरापासून काही अंतरावर असलेल्या शेतामध्ये पालापाचोळा वर रक्त सांडलेले दिसले तर त्याठिकाणी चप्पल मिळून आली होती. बराच वेळ शोधाशोध केल्यानंतर पिकांमध्ये कल्याण यांची मृत शरीर आढळून आले आहे. शरीरावरील जखमा व हल्ला पाहता जंगली प्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. तर परिसरात बिबट्याचा वावर असल्याबाबत चर्चा होती ती खरी ठरत असल्याचे दिसून येत आहे.
भिलारवाडी परिसरात मंगळवारी असाच एका जंगली प्राण्यांनी वासराचा बळी घेतला होता. तरीही वनविभाग जागे न झाल्याने आता करमाळा तालुक्यातील एक युवक शेतकरी गमवावा लागत आहे. वेळीच प्रशासनाने व वन विभागाने दखल घेतली असती तर कल्याणला जीव वाचला असता अशी चर्चा परिसरातून नागरिक करत आहेत. लिंबेवाडी हे गाव कर्जत व करमाळा तालुक्याच्या सीमेवर असून दोन्ही तालुक्यांमध्ये सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.