सर्व ग्रामपंचायत मध्ये शुल्क आकारणी फलक लावावा
करमाळा समाचार
तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालयामध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ च्या कलम ३ अन्वये शुल्क आकारणी फलक लावावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडुन करण्यात आली आहे. सदरचे निवेदन गटविकास अधिकाऱ्यांना रमेश चव्हाण, सोमनाथ जाधव व दत्तात्रय सुरवसे यांच्याकडुन देण्यात आले आहे.

तालुक्यातील बऱ्याच ग्रामपंचायती कार्यालयांमध्ये नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधांची ग्रामपंचायत कार्यालयाकडून जास्त प्रमाणात शुल्क आकारणी केली जाते. काही ग्रामपंचायती मध्ये सदरची आकारणी शासकीय शुल्क आकारणीच्या कितीतरी जास्त आहे. गावातील सामान्य गोरगरीब लोकांच्या खिशाला न परवडणारी आहे.

यातून नागरिकांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास येते. या कारणास्तव तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतच्या कार्यालयामध्ये शासकीय शुल्क आकारणी फलक महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ च्या कलम ३ अन्वये लावण्यात यावा असा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. सदर निवेदनावर रमेश चव्हाण कोर्टी, प्रहारचे उपाध्यक्ष सोमनाथ जाधव झरे, दत्तात्रय सुरवसे झरे, भारत चव्हाण कोर्टी आदींच्या सह्या आहेत.