अखेर चाळीस तासांनी सर्व मृतदेह मिळाले ; दोघांचा कुगाव तर चौघांचा झरे येथे अंत्यसंस्कार
करमाळा समाचार
उजनी जलाशयातील दुर्घटनेनंतर तब्बल 40 तासानंतर सर्वांचा शोध लागला असून त्यांच्यावर करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर दोघांवर कुगाव तर झरे येथील चौघांवर गावी झरे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणावर नातेवाईक तसेच गावकऱ्यांनी गर्दी केली होती.

गोकूळ दत्तात्रय जाधव (वय ३०), कोमल गोकूळ जाधव (वय २५), समर्थ गोकूळ जाधव (वय दीड वर्ष), वैभवी गोकूळ जाधव (वय ३, रा. झरे, ता. करमाळा, जि. सोलापूर), कुगाव येथील अनुराग अवघडे (वय ३५) व गौरव डोंगरे (वय २४), अशी बोट उलटून बुडाल्यांची नावे आहेत.

दोन दिवसांपासून एनडीआरएफचे जवान व इतर माध्यमातून सर्वांचा शोध घेण्याचे काम सुरू होते. परंतु प्रयत्न करूनही हाती काहीच लागत नव्हते. अखेर आज सकाळी सुरुवातीला दोन लहान मुलांसह पाच मृतदेह तरंगत कडेला आलेली दिसून आले. तर एक मृतदेह मिळण्यात उशीर झाला. शेवटी अखेरचा मृतदेह मिळून आला. त्यानंतर सर्व मृत शरीर करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात घेऊन आल्यानंतर त्या ठिकाणी पुढील प्रक्रिया पूर्ण करून आपापल्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
झरे येथे एकापाठोपाठ एक मृतदेह खाली उतरवत असताना बाहेरुन आलेल्या महिलांसह पुरुषांनाही अश्रूं अनावर झालेले दिसुन आले. णोठ्याप्रमाणावर गर्दी असताना देखील संपुर्ण गावात शुकशुकाट होता. अखेर सर्व मृत शरीर जिल्हा परिषद शाळे जवळीत स्मशानभूमीत नेण्यात आले व तिथे अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी कुटुंबीयांसह इतरांचा आक्रोश पहायला मिळाला.