करमाळासोलापूर जिल्हा

उजनीच्या पाण्यावरुन चाललेल्या वादात माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा इशारा

करमाळा समाचार

यशवंत सागर (उजनी प्रकल्प ) जलाशयाचे जल वाटप नियोजन यापूर्वीच झालेले आहे . सध्या सांडपाण्याचा एक थेंबही उजनी धरणात येत नाही . त्यामुळे इंदापूर येथील नवीन खडकवासला प्रकल्पास उजनीच्या सांडपाण्याच्या नावाखाली पाणी नेणे योग्य नाही. त्यामुळे सदर प्रकल्पास दिलेली मान्यता तात्काळ रद्द करावी व तशा प्रकारचा आदेश शासनाने तातडीने काढावा अशी मागणी माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी केली आहे .

याबाबत अधिक माहिती देताना माजी आमदार श्री .जगताप यांनी सांगीतले कि, सोलापूर जिल्हा हा कमी पर्जन्यमान असलेला दुष्काळी जिल्हा म्हणून महाराष्ट्रात परिचित होता . या भागातील शेतकरी ताठ मानेने उभे रहावा त्याची सर्वांगीण प्रगती व्हावी या उदात्त हेतूने स्व . यशवंतराव चव्हाण यांच्या कल्पक दृष्टीतून उजनी धरण उभारणीची संकल्पना पुढे आली . सुरुवातीस धरणाची साईट दौंड तालुक्यातील पारगाव जवळ निश्चित झाली होती .

परंतु धरणाचा फायदा सोलापूर जिल्ह्याला व्हावा यासाठी त्यावेळी सोलापूर जिल्ह्याचे नेते स्व .नामदेवराव जगताप यांनी आपली संपूर्ण राजकीय ताकत पणाला लावून धरणाची साईट बदलून माढा तालुक्‍यातील भीमानगर येथे घेतली . त्याचा दृश्य परीणाम म्हणून जो सोलापूर जिल्हा ज्वारीचे कोठार म्हणून ओळखला जात होता त्या जिल्ह्यात आज सर्वाधिक साखर कारखाने व ऊसाचे आगार म्हणून ओळखला जावू लागला आहे .

येथील शेतकर्‍यांच्या जीवनात आर्थिक क्रांती होवून त्यांचे जीवनमानाचा स्तर उंचावला आहे . सध्या या प्रकल्पावर जिल्ह्यातील जलसिंचन व पाणीपुरवठा योजना चालू आहेत . मराठवाड्याला देखील उजनीचे पाणी मंजूर केले आहे . सध्या उजनी जलाशयातील पाण्याचा वापर पूर्ण झाला आहे . तरीदेखील सांडपाण्याच्या नावाखाली इंदापूर साठी ५ टीएमसी पाणी मंजूर केले आहे . सदरची योजना झाल्यास याचा फार मोठा विपरीत परिणाम सोलापूर जिल्ह्यातील योजनांवर होणार असून नुकताच स्थिरस्थावर होवू लागलेला शेतकरी देशोधडीला लागणार आहे . उजनी प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता जरी ११७ टीएमसी असली तरी प्रत्यक्षात त्यामधे बहुतांश गाळ असल्यामुळे धरणाची साठवण क्षमता कमी झालेली आहे .

त्याच बरोबर धरणाचा जवळपास ८० कि.मी. असणाऱ्या व्यासामुळे बाष्पीभवणामुळे कमी होणारे पाणयाचे प्रमाण या बाबींचा देखील शासनाने अशा योजनांना मंजूरी देणेपुर्वी जलतज्ञांकडून आढावा घेणे अपेक्षीत आहे .उजनी प्रकल्प उभारणीसाठी सर्वाधिक गावे करमाळा तालुक्यातील गेली असून करमाळा तालुक्याने केलेला हा त्याग ही योजना झाल्यास व्यर्थ जाणार आहे . उजनी धरणग्रस्तांचे पुनर्वसनाचे प्रश्न देखील अजून प्रलंबीत आहेत .

तोपर्यंतच हा दूसरा मोठा अन्याय धरणग्रस्तांवर होणार आहे . करमाळा तालुक्याच्या दृष्टीने तर हा निर्णय अतिशय अन्यायकारक होणार आहे . कारण उजनी तसेच सीना – कोळगाव धरण उभारणीच्या वेळेस देखील सर्वाधीक त्याग हा करमाळा तालुक्यानेच केलेला आहे . करमाळा तालुक्याच्या तिन्ही बाजूस उजनी, कुकडी व सीना – कोळगाव हे तिन्ही प्रकल्प असून यांचे पाणी फक्त दृष्टीस दिसण्या साठीच आहे . ” धरण उशाला व कोरड घशाला” अशी आमची अवस्था झाली आहे .कुकडीच्या टेलला करमाळा असल्यामुळे कुकडीचे आवर्तण कधीच पूर्ण क्षमतेने मिळत नाही . मांगी तलावातून खाली पाणी सोडले जात नाही .

सीना – कोळगावचा फायदा मराठवाड्यालाच आहे . उजनीवर तर सोलापूर शहरापासून ते कित्येक शहरांच्या पाणीपुरवठा योजना, शेतीच्या सिंचन योजना कार्यान्वीत असून मराठवाड्यालाही प्रस्तावित पाणी मंजूर आहे . त्यामुळे करमाळा तालुक्याने अन्याय व त्यागाची भुमिका कुठपर्यंत घ्यायची? लाभ तर अजिबातच नाही . आता तरी सहनशिलतेचा अंत पाहू नये व इंदापूरला पाणी देण्यासाठी दिलेला तत्वतः मान्यतेचा आदेश रद्द केल्याची घोषणा तातडीने करावी .यशवंतराव चव्हाण, नामदेवराव जगताप यांनी ज्या शेतकरी हिताच्या उदात्त हेतूने धरणाची उभारणी केली . त्या उद्देशालाच या निर्णयाने हरताळ फासला जाणार आहे .

माझी शासनास विनंती आहे कि, इंदापूरला पाणी सोडणेचा हा निर्णय तात्काळ रद्द करावा अन्यथा राजकीय भेद न बाळगता जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनीधी पक्षभेद व गट -तट विसरून शेतकरी हितासाठी फार मोठे जन आंदोलन उभारतील. यासाठी जिल्ह्यातील नेते मंडळीसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची भेट घेणार असल्याचे देखील यावेळी माजी आमदार श्री . जगताप यांनी सांगीतले .

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE