माजी आमदार नारायण पाटील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला
जेऊर :
कोंढारचिंचोली-डिकसळ पुलासाठी 55 कोटी रुपयांचा निधी मागण्यात आला असून मुख्यमंत्री याबाबत सकारात्मक असल्याचे शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले. काल अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी माजी आमदार नारायण पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन करमाळा मतदार संघातील प्रलंबित कामांच्या पुर्ततेसाठी निधी मंजुर करण्यात यावा अशी मागणी केली.

यावेळी त्यांनी चर्चेबरोबरच एक लेखी निवेदन सुध्दा सादर केले. याबाबत अधिक माहिती देताना पाटील यांनी सांगितले की करमाळा तालुक्यातील कोंढारचिंचोली ते डिकसळ (प्रजिमा 190) दरम्यान भीमा नदीवर एक मोठा पुल असुन सद्यस्थितीत या पुलास जवळपास 150 वर्षे झाली आहेत. हा सर्वाधिक जुना असा पुल आहे. सद्या या पुलाची अवस्था बिकट असुन दळणवळणासाठी हा पुल धोकेदायक असा आहे.

या पुलामुळेच करमाळा व पुणे जिल्हा सीमा यांना जोडता येते. करमाळा तालुक्यातील जवळपास 30 गावांचे नागरिक पुणे, भिगवण, बारामती येथे जाण्यासाठी या पुलाचा वापर करतात. विद्यार्थी, नागरिक, शेतकरी, एस टी बसेस, मालवाहतुक वाहने, ऊस वाहतुक वाहने यांना या पुला शिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नाही. ब्रिटीशकालीन पुल असल्याने पंधरा वर्षापूर्वी या पुलाच्या पुर्ननिर्माणासाठी शासनास ब्रिटीश प्रशासनाने सुध्दा कळवले आहे.
परंतू अद्याप याकडे दुर्लक्ष केले जात असून आता या पुलाच्या कामास निधी मिळावा म्हणून आपण पाठपुरावा चालू ठेवला असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर या कामा विषयी आपण त्यांना माहिती दिली असून सरकार याकडे सकारात्मक दृष्टीने पाहत असल्याचे सांगितले गेले. या पुला शिवाय करमाळा मतदार संघातील सिंचन, दळणवळण, वीज व आरोग्य प्रश्नाबाबतही आपण सविस्तर निवेदने सादर केल्याची माहिती नारायण पाटील यांनी सांगितले.