माजी आमदार नारायण पाटील- सावंत गुप्त भेट ; भेटीमागे दडलय काय ?
करमाळा समाचार
माजी आमदार नारायण पाटील व माजी जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्यातील दुरावा जगजाहीर आहे. पण नुकतीच मा. आ. पाटील यांनी शिवसेना जिल्हा समन्वयक व आ. तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजीराव सावंत यांची भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. सदरची भेट ही ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी निमित्त झाल्याचे बोलले जात आहे. पण नेमके कारण गुलदस्त्यात आहे.

मागील विधानसभेत शिवसेनेतून पाटील यांना डावलून रश्मी बागल यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी अनेकदा पाटील यांनी मा. मंत्री यांची भेट घेऊन विनवण्या करण्याचा प्रयत्नही केला होता. पण यश हाती आले नव्हते. त्यानंतर अपक्ष उमेदवारी भरुन तालुक्यात आपली ताकद पाटील यांनी दाखवून दिली. त्यामुळे शिवसेनेलाही आजही त्यांची उणीव भासत आहे. वरिष्ठ पातळीवर पाटील यांचे वजन असून करमाळा तालुक्याच्या राजकारणात शिवसेनेला पाटील यांची गरज असल्याचे दिसून येते.

तसेच मागील काही काळापासून जिल्ह्यात शिवसेनेच्या बाबतीत घडलेल्या घडामोडींना माजी मंत्री तानाजी सावंत यांना जबाबदार धरण्यात आले होते. तर शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्या जवळचे नेते मानले जात असताना त्यांना मंत्री पदापासून लांब ठेववल्यामुळे शिवसेनेत सावंत यांच्यापासुन दुरावा ठेवल्याचे दिसून येत होते. काही दिवसांपूर्वी मा. मंत्री सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांचे बंधू शिवाजीराव सावंत व माजी आमदार पाटील यांच्या भेटी मागे नेमकं दडलंय काय हे कळाले नसले तरी सावंत आपली प्रतिमा सुधारण्यासाठी आमदार पाटील यांचा वापर करत करत तर नाहीत ना ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पण मागील विधानसभेचे पासून माजी आमदार पाटील यांच्या मनात सावंत यांच्याबद्दल पहिल्यासारखे प्रेम राहिलेले दिसून येत नाही. त्यामुळेच ही भेट पुढे वाढेल की पहिल्या भेटीनंतर संपुष्टात येईल. हे आताच बोलणे उचित होणार नाही. सध्या मा. आमदार पाटील यांना ही शिवसेनेची व शिवसेनेलाही आमदार पाटील यांची गरज असल्याने ते नेमकी काय भूमिका घेतील याकडे लक्ष लागून राहील.