मकाईच्या पात्र उमेदवारातील चौदांची माघार ; पाच गटातील उमेदवार अविरोध होण्याच्या मार्गावर
करमाळा समाचार
मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अद्याप हरकती घेतलेल्या अपात्र उमेदवाराचा निकाल राखून ठेवला असला तरी रोज कोणी ना कोणी उमेदवार हा माघार घेत आहे. त्यामध्ये आतापर्यंत 14 उमेदवारांनी आपले अर्ज माघार घेतल्याने पाच गटातील जागा या अविरोध होण्याच्या मार्ग मोकळा झाला आहे.

मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत एकूण 75 उमेदवारी अर्ज आले होते. त्यापैकी 36 उमेदवार अपात्र घोषित केल्यामुळे उर्वरित 39 अर्ज शिल्लक राहिले होते. त्यातील 14 उमेदवारांनी माघार घेतल्याने आता केवळ 25 उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले आहेत. त्यातही माघार घेण्याची अंतिम मुदत ही पाच जून असल्याने तोपर्यंत किती जण माघार घेतात यावर निवडणुकीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

याशिवाय अपात्र उमेदवारांच्या हरकतींवर सोलापूर येथे सुनावणी पूर्ण झाली असून येत्या दोन दिवसात त्याबाबतचा निर्णय होऊ शकतो. त्यावर विरोधी गटातील किती जणांचे अर्ज मान्य केले जातील किंवा मान्य केले जाणार नाहीत यावर निवडणूक कोणत्या दिशेने जाईल हे जाहीर होईल. तत्पूर्वी उमेदवाराने माघार घेतल्यामुळे चिखलठाण, सहकारी संस्था, भटक्या विमुक्त जाती जमाती, इतर मागासवर्ग व अनुसूचित जाती जमाती या गटातील उमेदवारांना विरोधक राहिला नसल्याने यांचा अविरोध मार्ग मोकळा झाल्याचे दिसून येत आहे.
चिखलठाण गटातून सतीश निळ व दिनकर सरडे, सहकारी संस्था गटातून नवनाथ बागल, भटक्या विमुक्त जाती जमाती मधून बापू चोरमले, इतर मागास अनिल अनारसे व अनुसूचित जाती जमाती मधून आशिष गायकवाड आदि उमेदवार यांचे अर्ज शिल्लक राहिले आहेत.
भिलारवाडी मंगल हाके, पारेवाडी नितीन पांढरे, हनुमंत निकत, स्वाती पाटील, चिखलठाण निर्मला इंगळे, आप्पासाहेब सरडे, वांगी तुकाराम पिसाळ, मनीषा दौंड, मांगी रोहित भांडवलकर, रवींद्र लावंड, हरिश्चंद्र झिंजाडे, भटक्या विमुक्त जाती जमाती राजश्री चोरमले, महिला राखीव शांता झोळ, अनुसूचित जाती जमाती सुषमा गायकवाड आदि १४ उमेदवारांनी माघार घेतली आहे.