करमाळासोलापूर जिल्हा

भटक्या विमुक्तांची गुन्हेगार शिक्क्यापासून मुक्तता दिन ; हा समाज विकासाच्या प्रवाहात कधी येणार? – माने

करमाळा-

भटक्या जाती – जमाती समाजातील वेगवेगळ्या घटकांची पोटाची भूक भागविण्यासाठी चालू असणारी भटकंती अजुनही संपली नाही. त्यांच्या जीवनाला स्थैर्य मिळण्यासाठी शासनाकडून ठोस कार्यवाहीची अपेक्षा आहे. हा समाज विकासाच्या प्रवाहात कधी येणार, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण माने यांनी केला आहे.

इंग्रज राजवटीत जन्मजात गुन्हेगार असा शिक्का बसलेल्या भटके विमुक्त जाती-जमातीच्या घटकांना देशाच्या स्वातंत्र्यानंतर ३१ ऑगस्ट १९५२ ला संसदेत विशेष ठराव करुन गुन्हेगार या शिक्क्यातून मुक्त करण्यात आले होते. म्हणजेच ३१ ऑगस्ट हा दिवस भटके विमुक्त जाती-जमातीच्या घटकातील समाजासाठी स्वतंत्र करणारा ठरला होता. त्याला या वर्षी ७० वर्षे होत असल्याच्या पार्श्वभूमीवर माने यांच्याशी संवाद साधला असता ते बोलत होते.

politics

भारत देश १५ ऑगस्ट १९४७ ला स्वतंत्र झाला. त्यानंतर ३१ ऑगस्ट १९५२ ला भटके विमुक्तांना गुन्हेगार शिक्क्यापासून मुक्ताता मिळाली. या घटनांना आता मोठा काळ लोटला आहे. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या वर्षी साजरा झाला. मात्र आजही भटके विमुक्त जाती घटकातील अनेकांचे जीवनमान विकासाच्या प्रवाहात आले नाही. याकडे माने यांनी लक्ष वेधले.

पुढे बोलताना माने म्हणाले की, भटके विमुक्त घटकांवर त्यावेळी असणारा जन्मजात गुन्हेगार शिक्का हा अन्यायकारक होता. देश स्वातंत्र्यानंतर या समाजासाठी शासन ठोस उपाययोजना करुन त्यांचा विकास करेल. ही अपेक्षा होती. परंतु प्रत्यक्षात देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे होवूनही या समाज घटकाच्या अनेक व्यथा, वेदना तसेच भटकंतीचे जीणे कायमच असल्याचे दिसून येत आहे. भटक्या विमुक्त जाती – जमाती समाज घटकातील नागरिक स्वातंत्र्याच्या ७५ वर्षे काळातही विकास प्रक्रियेपासून दूर आहेत. ना घर, ना जमीन, ना सरकारी नोकरी अशा अवस्थेतील हे बांधव पोटाची खळगी भरण्यासाठी भटकंती करत आहेत.

भटके विमुक्त जाती – जमाती समाज घटकांच्या वर्तमानातील अवस्थेचा विचार करुन त्यांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक उन्नतीसाठी अनुसुचित जाती, जमातीप्रमाणे भटक्या विमुक्त जाती – जमाती घटकांच्या विकासासाठी शासनाकडून प्रयत्न झाले पाहिजेत. अशी अपेक्षाही माने यांनी याप्रसंगी व्यक्त केली.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE