तयारीला लागा ; यंदा महाविकास आघाडीकडुन आबाला निवडुन द्या
करमाळा
लोकसभा निवडणुकीमध्ये करमाळा तालुक्यातून मिळालेल्या मताधिक्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट चे नेते माजी आमदार नारायण पाटील यांच्या वर खुश असल्याचे दिसून येत आहेत. लोकसभा निवडणुका संपताच विधानसभेच्या तयारीला लागल्याचा एक प्रकारे हिरवा कंदील श्री पाटील यांना दाखवण्यात आला आहे. निवडणुकांनंतर करमाळा तालुक्यातील पदाधिकारी प्रदेशाध्यक्ष यांना भेटण्यासाठी गेल्यानंतर जयंत पाटील यांनीही नारायण पाटील यांना निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत असे आदेश दिले आहेत. त्यामुळे विधानसभेसाठी आता राष्ट्रवादीकडून पाटील यांनाच उमेदवारी मिळणार हे निश्चित झाले आहे.

लोकसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी गावोगावी आभार प्रदर्शन व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कार्यकर्ता मेळावा व भेटीगाठी घेतल्या होत्या. या दरम्यान येणाऱ्या विधानसभेत माजी आमदार नारायण पाटील यांचे नाव विधानसभेसाठी जाहीर केले होते. मुळातच राष्ट्रवादी पक्षाकडेही माजी आमदार नारायण पाटील यांच्याशिवाय तुल्यबळ उमेदवार नसल्यामुळे महाविकास आघाडीतून पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.

दरम्यान राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत मांढरे यांनी मुंबई येथे प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेमध्ये येणाऱ्या विधानसभेमध्ये माजी आमदार नारायण पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत असे आदेश कार्यकर्त्यांना देण्यात आले आहेत अशी माहिती हनुमंत मांढरे पाटील यांनी दिली.