जेवायला माघारी आलो म्हणत माघारी आलाच नाही ; खुनाचा गुन्हा दाखल
जेवायला माघारी येतो म्हणून गेलेला तरुण माघारी आलाच नाही. तर रात्रभर वाट पाहून त्याचा सकाळी शोध गेल्यानंतर एका शेतात त्याचा मृतदेह मिळून आला. सदरच्या मुलाच्या डोक्यामध्ये गंभीर जखम करून त्याचा खून करण्यात आला होता. घटनेची माहिती पोलिसांना कळवल्यानंतर अनोळखी व्यक्ती विरोधात करमाळा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा प्रकार साडे येथे शनिवारी रात्री घडला आहे.
रोहित राजा काळे (वय १९) रा. साडे ता. करमाळा असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर या प्रकरणी अनोळखी व्यक्तीवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची तक्रार बालिका राजा काळे रा. साडे हिने दिली आहे. रोहित राजा काळे याच्या कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर असल्याने तो शेतीमध्ये मजुरी करून आपल्या कुटुंबाचे उपजीविका चालवत होता. कधीच सुट्टी न घेणारा रोहितने शनिवारी मात्र सुट्टी घेतली होती व रात्री त्याच्या ओळखीच्या कोणासोबत तरी गेला असावा.

यावेळी आपण रात्री जेवण्यासाठी माघारी येतो म्हणून गेलेला रोहित परत घरी आला नाही. त्याचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह घरापासून काही अंतरावर मिळून आला आहे. त्यानंतर कुटुंबीयांनी करमाळा पोलीस ठाण्यात संबंधित प्रकाराबाबत माहिती दिली. सदर घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पोपट टिळेकर हे करीत आहेत.