अवकाळीचा एंट्रीने मोठ्याप्रमाणावर नुकसान ; तीन जनावरे दगावली, केळी पीकांचे नुकसान
करमाळा – विशाल घोलप
करमाळा तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसात वीज पडून दोन म्हैस व एक गाई ठार झाले आहे. तर तालुक्यातील केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यासंदर्भात दोन दिवसात पंचनामा करून एकूण नुकसान ग्रस्त भागाची नोंद केली जाईल अशी माहिती कृषी अधिकारी संजय वाकडे यांनी दिली.

तालुक्यात सोमवारी रात्री झालेल्या पावसामुळे ठिकठिकाणी केळी तसेच कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार आतापर्यंत १८१ हेक्टर वर केळी पिकाचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. तर देवळाली येथे उस्मान शेख व टाकळी येथील बाळकृष्ण गुळवे यांच्या प्रत्येकी एक म्हैस दगावली आहे. तसेच गुळसडी येथील रघुनाथ ज्योतिराम माने यांची वादळी वारे व पावसात वीज पडून एक गाई दगावली आहे.

तालुक्यात सर्व दूर पाऊस झाला आहे. रात्री नऊच्या सुमारास सुरू झालेला पाऊस वादळी वाऱ्यासह बरसत होता. यावेळी मिरगव्हाण, जिंती, वीट, विहाळ, कोळगाव, निमगाव यासह तालुक्यात वेगवेगळ्या भागांमध्ये शेतीतील पिकांचे नुकसान झाले आहे. तर सोमवारी वीट येथे तर मंगळवारी दुपारी झालेल्या पावसामुळे जामखेड रस्त्यावरील झाड पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. नुकसान झालेल्या पिकाची पाहणी करून पंचनामा करावा तसेच भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे.