रात्री पावसाची जोरदार हजेरी ; मोफत ज्वारी बियाणे उपलब्ध संपर्क साधा
करमाळा समाचार
बऱ्याच दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांसह व्यापारी हवालदिल झाला होता तर पिण्याच्या पाण्याची ही अडचण निर्माण झाली होती. परंतु मागील तीन ते चार दिवसापासून वेगवेगळ्या भागात पावसाने हजरी लावत एक प्रकारे समाधान दिले आहे. करमाळा शहरात ही रात्री जवळपास तीन तास पाऊस बरसत होता. त्यामुळे एक सुखद वातावरण निर्मिती झाली आहे.

यापूर्वी सर्व अंदाज खोटे ठरवत पाऊस गायब झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात हाल व नुकसान झाले आहेत. परंतु आता होत असलेल्या पावसामुळे कमीत कमी जनावरांचा चारा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल. तात्पुरता तरी दिलासा मिळेल अशी शक्यता आहे. त्यामुळे केवळ एक-दोन दिवसाच्या पावसावर नाही तर परतीच्या पावसापर्यंत आणखी मोठे पावसाची अपेक्षा शेतकऱ्यांना असणार आहे.

पावसाच्या आगमनानंतर कृषी विभागाकडून ही एक दिलासादायक बातमी मिळत आहे. तालुक्यात तब्बल आठ हजार एकर पीक घेऊ शकेल इतके ज्वारीचे बियाणे उपलब्ध झाले आहेत. तर आपल्या परिसरातील कृषी सहाय्यकांना संपर्क करून ज्वारी बियाणे घ्यावेत असे आवाहन कृषी अधिकारी संजय वाकडे यांनी केले आहे. प्रती हेक्टरी दहा किलो बियाणे देण्याचे नियोजन असून त्यासाठी आपला सातबारा, आठ अ घेऊन जाणे अपेक्षित आहे. तर यानंतर इतर औषधेही मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी संपर्क साधावा.