करमाळासोलापूर जिल्हा

नाळेवस्तीवर क्रांतिसूर्य महात्मा फुले व प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती

माजी विद्यार्थ्यांकडून जिल्हा परिषद शाळेस पुस्तकांची भेट

करमाळाः तालुक्यातील नाळेवस्ती येथे क्रांतिसूर्य महात्मा फुले व प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी नाळेवस्ती ग्रामस्थ, जिल्हा परिषद शाळेचे माजी विद्यार्थी तसेच जिल्हा परिषद शाळा यांच्या वतीने विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते.

सदर जयंती कार्यक्रमास यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक प्रा. गणेश करे – पाटील, सरपंच युवराज नाळे, पोलीस उपनिरिक्षक शाहू दंडे, सारथी शाहू महाराज प्रशिक्षण, संशोधन व मानव विकास संस्था येथील इंग्रजी विषय तज्ञ रेवणनाथ नाळे, सुदाम नाळे, आरपीआयचे तालुकाध्यक्ष अर्जुन गाडे, विहाळ जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सतीश कांबळे उपस्थित होते.

सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा फुले व प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवजयंती निमित्त शाळेस प्रिंटर भेट देणाऱ्या नाळेवस्ती येथील माजी विद्यार्थ्यांनी महात्मा फुले व डॉ. आंबेडकर जयंती निमित्ताने शाळेस पाच हजार रुपये किंमतीची पुस्तके भेट दिली.

याप्रसंगी बोलताना प्रा. करे – पाटील यांनी, नाळेवस्तीवरील युवा पिढीचे योगदान कौतुकास्पद आहे. दोन महामानवांची एकत्रित जयंती अशाप्रकारे साजरी करणे अनुकरणीय आहे. येथील विद्यार्थ्यांना चांगले भविष्य आहे. असे मत व्यक्त केले. तसेच संयुक्त जयंती निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाळेवस्ती येथे आयोजित विविध गुणदर्शन स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना यशकल्याणीच्या वतीने बक्षीसे व सन्मानपत्र देण्याचे जाहीर केले. यावेळी मोनिका नाळे, पायल नाळे, अथर्व नाळे, जान्हवी नाळे, सृष्टी बंडगर यांची भाषणे झाली.

या कार्यक्रमात नूतन पोलीस उपनिरिक्षक शाहू दंडे, सारथी शाहू महाराज प्रशिक्षण, संशोधन व मानव विकास संस्था येथे इंग्रजी विषय तज्ञपदी निवड झालेले रेवणनाथ नाळे, नाळेवस्तीचे पहिले एमबीबीएस डॉ. तुषार नाळे यांचे वडील सुदाम नाळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असणाऱ्या शिक्षिका अनुराधा शिंदे, विहाळचे मुख्याध्यापक सतीश कांबळे यांचे विशेष सन्मान करण्यात आले. तसेच विविध गुणदर्शन स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीसांचे वाटप करण्यात आले.

यावेळी ग्रामपंचायतचे आजी, माजी सरपंच व सदस्य, ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशासाठी नाळेवस्ती येथील युवा वर्गाने परिश्रम घेतले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE