बातमीचा परिणाम! अखेर कारखान्यातील राखेचे प्रमाण घटले
‘करमाळा समाचार’च्या वृत्तानंतर राखेच्या प्रदूषणाचा मुद्दा चर्चेत; नागरिकांमध्ये समाधान, मात्र कायमस्वरूपी उपाययोजनांची अपेक्षा
करमाळा समाचार


कारखान्यातून पसरणाऱ्या राखेमुळे शहरातील विविध भागांत धूळ आणि राख साचत असल्याचा मुद्दा ‘करमाळा समाचार’ने बातमीच्या माध्यमातून समोर आणला होता. या समस्येमुळे नागरिकांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त होत असताना, आता परिसरात राखेचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येत आहे.
राखेच्या प्रदूषणाचा प्रश्न बातमीद्वारे ऐरणीवर आल्यानंतर या विषयाकडे नागरिकांचे आणि संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधले गेले आहे. राखेचे प्रमाण घटल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या बदलामागे बातमीचा थेट परिणाम असून संबंधित कारखान्याने तात्पुरत्या उपाययोजना केल्या आहेत असे दिसून येते. होऊ शकते तर कायम स्वरूपी का नाही?

शहरातील नागरिकांना स्वच्छ हवा मिळणे हा त्यांच्या आरोग्याशी संबंधित महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे राखेचे प्रमाण कमी झाल्याने समाधान व्यक्त होत असले, तरी ही समस्या पुन्हा उद्भवू नये यासाठी कारखान्याच्या प्रदूषण नियंत्रण यंत्रणेची तपासणी, हवेच्या गुणवत्तेचे मोजमाप आणि आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे.
नागरिकांना आवाहन
शहरातील किंवा परिसरातील कोणत्याही भागात अद्याप राख पसरत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ आणि ठिकाणाच्या माहितीसह ‘करमाळा समाचार’ (7276755369) संपर्क साधावा. नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी वृत्तपत्राचे प्रयत्न सुरू राहतील.
जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणे आणि प्रशासनाचे लक्ष वेधणे, हीच पत्रकारितेची ताकद!


