घर जाळुन लढणाऱ्या मराठ्यांच्या बाबतीत तुमचे प्रेम दिखावा आहे काय ; उत्सव कसले साजरे करताय ?
करमाळा समाचार
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटा येथे पोलिसांनी मराठा बांधवावर अचानकपणे केलेल्या निषेधार्थ महाराष्ट्र पेटुन उठला आहे. रोज बंद, मोर्चे व आंदोलने केले जात आहेत. अशातच आता दहिहंडीसारखा उत्सव आला आहे. तो साजरा करण्यात काही मराठा समाजाचे कार्यकर्ते समोर येऊ लागले आहेत. येवढ्या लवकर आपण राग विसरुन जातो त्यामुळेच हे लोक असे घाण कृत्य करु शकतात हे त्यांच्या लक्षात आलय. त्यामुळे मनातला राग येवढ्या लवकर शांत करणार असाल तर राग आल्याचा दिखावा कशासाठी करायचाय ?

सराटा येथे अमानुषपणे मारहाण करण्यात आली. हल्ल्यात मोठ्या प्रमाणावर लहान मुले, वृद्ध, महिला व युवक जखमी झाले आहेत. एका रात्रीतून तब्बल साडेतीनशे पेक्षा जास्त गुन्हे दाखल झाले आहेत. शेकडो बांधव आजही उपोषण ठिकाणी बसून आहेत. कित्तेकाच्या घरात चुल पेटली नाही गुंह्याच्या भितीने समाजबांधव घर सोडुन बाहेर फिरतो आहे. त्याला उपचार मिळाले का नाही हा प्रश्न आहे आणि आपण आता सण व उत्सव साजरे करणार आहोत का ?

मराठा समाजासह इतर समाजाचे लोकही आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यांचा जरी आरक्षणाला पाठिंबा असेल किंवा नसेल पण जी घटना घडली ती निषेधार्ह आहे हे मानून प्रत्येक जाती धर्माचा माणूस हा आज मराठा समाजासोबत उभा आहे. पण केवळ देखावा करण्यापुरता मराठा समाजाच्या काही कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग न घेता प्रत्येक क्षणाला त्या लोकांचा विचार केला पाहिजे जे लोक तुमच्यासाठी आंदोलन करीत आहेत, तुमच्यासाठी मार खात आहेत.
सण उत्सव साजरे करण्यासाठी पूर्ण आयुष्य पडले आहे. हीच वेळ आहे सध्या जे लोक आपल्यासाठी लढत आहेत त्या लोकांसाठी रस्त्यावर उतरून त्यांची बाजू मांडण्याची त्यांच्यासोबत आम्ही आहोत सांगण्याची. ते तिकडे मार खातील घर सोडून पळून जातील, उपचारासाठी वणवण फिरत असतील आणि आपण इकडे ढोल ताशांच्या गजरात दहीहंडी सारखे उत्सव साजरे करत असू तर यापेक्षा दुर्दैव काय असेल. त्यामुळे मराठा समाजाने व मराठा समाजाला आपलं मानणाऱ्यांनी आंदोलनात सहभागी होणर नसताल तर नका होऊ पण कमीत कमी उत्सव साजरे करून मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळू नये.