कोर्टी वीज उपकेंद्राच्या क्षमतेत वाढ—- आमदार संजय मामा शिंदे यांची माहिती
करमाळा समाचार – संजय साखरे
महाराष्ट्र शासनाने आणलेल्या कृषी पंप धोरण 2020 ची अंमलबजावणी करण्यात महावितरणचे बारामती परिमंडळ राज्यात अग्रेसर राहिले आहे .आतापर्यंत या धोरणातून बारामती परिमंडळ ने 502 कोटींची वसुली केली आहे.
या धोरणातील तरतुदीनुसार वसूल झालेल्या रकमेतील 66 टक्के रक्कम कृषी आकस्मिक निधी या योजनेखाली नवीन वीज जोडण्या, नवीन उपकेंद्रे ,व उपकेंद्र क्षमता वाढ यासाठी वापरली जाणार आहे.

बारामती परिमंडळात पुण्यातील सहा तालुके व सोलापूर आणि सातारा हे दोन जिल्हे येतात .वसुल झालेल्या रकमेतून ते 33 टक्के निधी गाव पातळीवर व ते 33 टक्के निधी जिल्हा पातळीवर विजेच्या पायाभूत सुविधा व नवीन कनेक्शन साठी खर्च करण्यात येत आहे.
याच कृषी आकस्मिकता निधीतून करमाळा तालुक्यातील कोर्टी येथील 33/11 केव्ही क्षमतेची असलेल्या वीज उपकेंद्रांमध्ये नवीन पाच मेगावॉट क्षमतेच्या ट्रांसफार्मर ला मंजुरी मिळाली आहे अशी माहिती आमदार संजय मामा शिंदे यांच्या कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.

कोर्टी वीज उपकेंद्राच्या वाढीव क्षमतेला मंजुरी मिळाली असून लवकरच टेंडर निघाल्यानंतर हे काम सुरू होईल -सुमित जाधव उप अभियंता महावितरण, करमाळा