करमाळा समाचार इम्पॅक्ट – कचेरी रस्त्याचे खड्डे बुजवणे सुरु
करमाळा समाचार
करमाळा शहरातील केतुर नाका ते न्यायालय रस्ता अत्यंत खराब झाल्याबाबत करमाळा समाचार मध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. यानंतर प्रशासन तातडीने कामाला लागले असून सदरचे खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले आहे. मुळातच सदरच्या बातम्या करणे गरजेचे का पडावे हा प्रश्न आहे. ज्या ठिकाणी काम रखडले आहे. लोकांची अडचण होताना दिसते आहे त्या ठिकाणी प्रशासनाने स्वतः लक्ष दिल्यास लोकांना तक्रारी करण्याची गरज पडणार नाही.


मागील गणपती उत्सवाच्या दरम्यान नगर परिषदेला याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु नगर परिषदेचे काम अत्यंत धिम्या गतीने सुरुवात असून या ठिकाणी प्रशासक असल्याने नेमकी दाद कोणाकडे मागायची हा प्रश्न आहे. गणपती उत्सवा दरम्यान ही करमाळा समाचार मध्ये सदरचे वृत्त प्रसिद्ध केले होते. यावेळी शहरातील खड्डे बुजवण्यात आले परंतु ज्या भागात विसर्जन होणार होते त्या भागात विसर्जन रस्त्यावर मात्र खड्डे बुजवण्यात नगरपरिषदेने केवळ खडी आणून टाकली. कालांतराने ती खडी चोरीला गेल्याचेही दिसून आले. पण खड्डे बुजले नव्हते.
पुन्हा 26 जानेवारी दिवशी मोठ्या प्रमाणावर गर्दी ही तहसील परिसरात असते याचीही जाणीव नगरपरिषदेला नव्हती. ज्यावेळी करमाळा समाचारने वृत्त प्रसिद्ध केले. त्यावेळी नगर परिषदेला जागा आली व सदरचे खड्डे बुजवण्यात आले. याबाबत बातमी करण्यापूर्वी संबंधित विभागाला तीन ते चार वेळा कल्पना दिलेली असतानाही सदरची कामे होत नाहीत. त्यामुळे लोकांच्या प्रशासनाच्या कामावर विश्वास राहिलेला नाही त्यांनी स्वतःचे काम सुधारणे गरजेचे आहे.