संघात सर्वाधिक बोली मिळवत पुण्याच्या संघात ऋतूराज सोबत खेळणार कोळगावचा सुरज शिंदे
करमाळा समाचार
आयपीएल प्रमाणे आता 15 जून पासून महाराष्ट्र प्रीमियम लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी सहा संघांची घोषणा करण्यात आली. यामध्ये तीनशे खेळाडूंचा निलाव पार पडला त्यात करमाळा तालुक्यातील कोळगाव येथील सुरज शिंदे याला पुणेरी बाप्पा या संघाकडून सर्वाधिक बोली लावून घेण्यात आले आहे. शिंदे हा ऋतुराज गायकवाड च्या संघात खेळताना दिसणार आहे.

आयपीएलच्या धर्तीवर राज्यात महाराष्ट्र प्रीमियम लीग स्पर्धा आयोजित केली आहे. 15 जून ते 29 जून दरम्यान पुणे येथे गहुंजे स्टेडियमवर ही स्पर्धा आयोजित करणार आहे. एम पी एल क्रिकेट स्पर्धेत केदार जाधव, ऋतुराज गायकवाड, राहुल त्रिपाठी सारख्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह सुमारे शंभर अव्वल दर्जाच्या क्रिकेटपटूंचा सहभाग असणार आहे. बीसीसीआयने या स्पर्धेला मान्यता दिली आहे.

हे आहेत सहा संघ ..
सुहाना मसाले ग्रुपचा पुणे संघ ‘पुणेरी बाप्पा‘ नावाने ओळखला जाईल. ऋतुराज गायकवाड हा संघाचा आयकॉन खेळाडू असेल. पुनित बाल समूहाचा संघ ‘कोल्हापूर टस्कर्स’, ईगल इन्फ्रा इंडियाचा संघ ईगल ‘नाशिक टायटन्स’, वेंकटेश्वरा इंडस्ट्रियल चा संघ ‘छत्रपती संभाजी किंग्स’, जेट्स सिंथेसिस चा संघ ‘रत्नागिरी जेट्स’ आणि कपिल सन्स ‘सोलापूर रॉयल्स’नावाने ओळखले जाणार आहे.
पुणेरी बाप्पा संघाने सुरज शिंदे साठी दोन लाख चाळीस हजार सदरची बोली ही पुणेरी बाप्पा संघात सर्वाधिक आहे. सुरज हा करमाळा तालुक्यातील कोळगाव येथील शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे. मोठ्या कष्टाच्या जोरावर त्यांनी मोठी कामगिरी करून दाखवली आहे. येणाऱ्या काळात भारतीय संघासाठी खेळण्याचे त्याचे स्वप्न आहे तर खडतर अशा कोरोना काळातही त्याने आपली फिटनेस गमावली नाही त्या कष्टाचे चीज झाले.