कुणबी प्रमाणपत्र – एजंटच्या नावासह जिल्हाधिकारी कडे तक्रार ; मराठा समाजाकडुन निवेदन
करमाळा – विशाल घोलप
कुणबी मराठा जात पडताळणीसाठी नाहक त्रास दिला जात असून एजंट मार्फत गेल्यास जात पडताळणी प्रमाणपत्र मिळत आहे. अन्यथा हेलपाटे मारावे लागत आहे. त्याशिवाय ६० ते ७० हजार रुपये पैशाची मागणी केली जात आहे. यावर चौकशी करून कारवाई करावी व गुन्हे दाखल करावेत. तसेच जात पडताळणी प्रमाणपत्र शाळा भरल्यानंतर सहा महिन्यापर्यंत घेण्यात यावेत अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

कॉलेज प्रवेश प्रक्रिया चालू झाली आहे. सीईटीचे निकाल लागले आहेत. प्रवेश घेताना जात वैधता मागतात आणि सोलापूर येथे जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत आहे. याशिवाय करमाळा तालुक्यातील तहसील आवारात सोलापूरचे एजंट म्हणून काहीजण काम करीत आहेत. त्यांच्यामार्फत ५० ते ७० हजार रुपयांची मागणी केली जात आहे. एजंट शिवाय प्रमाणपत्र काढण्यासाठी गेल्यानंतर संबंधित एजंट व अधिकारी यांच्यातील फोन रेकॉर्डिंग व इतर माहिती तपासावी व संबंधितावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी या पत्रात केली आहे. यावेळी सचिन काळे, माऊली पवार, प्रा. रामदास झोळ, गणेश देशमुख, ऱविंद्र गोडगे आदी उपस्थित होते.

तीघांची नेमणुक एकच हजर …
ऑफिस मध्ये साहेब उपस्थित नाहीत असे कारण सांगितले जाते, एजंट लोकांच्या मार्फत पैसे घेऊन काम होतात, परंतु स्वतः गेल्यानंतर काम होत नाहीत. तीन अधिकाऱ्यांची समिती आहे त्यापैकी एकच कोणीतरी उपस्थित असतात, प्रांत अधिकारी व तहसील अधिकारी यांच्या माध्यमातून दिला गेलेला कुणबीचा दाखला हाच पुरावा समजावा इतर कोणत्याही कागदपत्राची मागणी करू नये. कागदोपत्री पूर्तता केल्यानंतर दाखला मिळत नाही. कुणबी प्रमाणपत्र काढलेल्या लाभार्थ्याच्या मुलांना तात्काळ प्रमाणपत्र मिळाले पाहिजे अशा विविध मागण्य व तक्रारी करण्यात आल्या आहेत.
बघु आता तरी कारवाई होतेय का ?
यासंदर्भात अनेकदा तक्रारी केल्या आहेत. तरीही त्या परिसरात एजंट मार्फत लूट सुरूच आहे. त्यामुळे आता थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार व संबंधित एजंट ची नावे दिली आहेत. यात पुढे प्रशासन कोणती भूमिका घेते त्यावर पुढील आंदोलन ठरवले जाईल. मराठा समाजातील गोरगरीब लोकांना या ठिकाणी लुबाडण्याचे काम थांबवण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे.
– सचिन काळे, करमाळा.