बिबट्याचा पुन्हा हल्ला ; वनविभाग दिखाऊपणातुन कधी बाहेर पडणार ?
करमाळा समाचार
तालुक्यात विविध ठिकाणी कायमच बिबट्याचा वावर व हल्ल्याच्या बातम्या ऐकू येतात. पण अद्यापही बिबट्या मिळून आला नाही. वन विभाग मोहोळ मध्ये शांतपणे बसून सर्व घटना पाहत आहे. पण करमाळ्यात येऊन किंवा जिल्ह्याच्या टोकाला असलेल्या करमाळ्यात एखादं कार्यालय बिबट्या सदृश्य प्राण्यांसाठी उभारावे असे त्यांना वाटत नाही. जेणेकरून हल्ला होता क्षणी ते कर्मचारी तेथे पोहोचून उपाययोजना राबवू शकतात.

सुरुवातीला तालुक्याच्या पश्चिम भागात कायमच बिबट्या असल्याने हल्ल्याचे प्रमाण दिसून येत होते. पण आता बिबट्याने आपला मोर्चा उत्तर व पूर्वभागाकडे वळवल्याची दिसून येत आहे. काही दिवसांपासून मांगी, वडगाव, पोथरे या परिसरात बिबट्याने हल्ला केल्याच्या चर्चा होत्या व त्या ठिकाणी दिसूनही आला होता. वनविभागाने दिखावा करत कार्यवाही केली. पण पुढे त्याचे काहीच झाले नाही तो बिबट्या कुठे गेला ? याचं कोणाला कल्पनाही नाही व चर्चाही नाही.

पिंजरे लावल्यानंतर आपले काम संपले असे समजून वनविभाग त्या परिसरात पुन्हा फिरकत नाही. लोकांच्या जीविताला धोका होऊ शकतो किंवा होण्याची शक्यता आहे. तरीही कोणताही कर्मचारी त्या परिसरात रेकी करत नाही किंवा त्या वन्य प्राण्यांना शोधण्याचा प्रयत्न करत नाही. अशा प्रकारच्या वन्य प्राण्यांना शोधून त्यांच्यावर जीपीएस सारखी यंत्रणा लावल्यास सदरचे प्राणी कोणत्या परिसरात कुठे फिरतात हे एकाच ठिकाणी बसून कळणार असले तरी अशा प्राण्यांना शोधून ओळख पटवण्यासाठी तयारी वनविभागाची नाही किंवा प्रशासनाला हे कळून येत नाही.
नुकताच बिबट्या सदृश्य प्राण्याने आज पहाटे बाळेवाडी येथे शिवाजी नलवडे यांच्या वस्ती शेजारील सुरेश मोरे यांच्या कुत्र्यावर हल्ला केला. रात्री दीडच्या सुमारास सदरचा हल्ला झाला. त्यावेळी जवळच असलेल्या ग्रामस्थांनी आवाज ऐकून कालवा केला व गोंधळामुळे बिबट्या सदृश्य प्राणी संबंधित कुत्र्याला त्याच ठिकाणी टाकून पळून गेला. पण कुत्रा एवढा घाबरलेला होता की तो रात्री पळून गेला आहे तो माघारी आलाच नाही. पण ग्रामस्थांनी रात्रभर फटाके फोडून बिबट्याला पळून लावण्याचा प्रयत्न केला . पण बाळेवाडीत भीतीचे वातावरण कायम आहे. रात्रभर लोक झोपलेले नाही, पुन्हा कधी येईल याची शाश्वती नाही अशा परिस्थितीत भीतीच्या वातावरणाखाली लोक राहत आहेत. आता तरी वन विभाग दखल घेणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.