जगण्यासाठी माणसांवर आणि स्वतःच्या ध्येयावर प्रेम करा – रोहित चौधरी
करमाळा समाचार
जन्म आणि मृत्यू यामधील आयुष्य सुंदरतेने जगण्यासाठी माणसावर प्रेम केले पाहिजे, असे उद्गार सहायक पोलीस निरीक्षक मा.श्री.रोहितजी चौधरी यांनी काढले. मोरवड विद्यालयात गुणवंतांचा सत्कार संपन्न झाला या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

पुढे बोलताना विद्यार्थ्यांना ते म्हणाले की, सहिष्णुता, सेवा आणि मानवता ही मूल्ये आयुष्यभर आपण जपली पाहिजेत. मानवी व्यक्तिमत्व हे जीवनाचे श्रेष्ठ मूल्य आहे. आयुष्यभर जपलेल्या मूल्यांवर जीवनाची सार्थकता अवलंबून असते. ज्ञान हे नव्या जगाचे भांडवल आहे.

ज्ञानाने संपन्न असणारी तरूणाई घडविण्यासाठी शिक्षकांनी ग्रंथव्यासंग जपला पाहिजे, आजच्या जागतिकीकरणाच्या काळात वैज्ञानिक प्रगतीमुळे सारे विश्व माणसाच्या घरात आले आहे. पण माणूस माणसापासून दुरावत चालला आहे. परस्परातील संवाद तुटत चालले आहेत. विश्वास आणि प्रेम हाच सुंदर जगण्याचा खरा गुरूमंत्र आहे. जीवनाच्या विचित्र चित्रात ज्याला रंग भरता येतात त्याच्या जीवनाचे चित्र आपोआप सुंदर होते, असेही रोहितजी चौधरी म्हणाले.
यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष मा.गणेश करे पाटील यांच्या कल्पक विचारातून इ. १० वी मध्ये प्रथम ,द्वितीय व तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना आज बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले.प्रथम क्रमांकाचे बक्षीस चि. रोहन गजेंद्र नाळे यास ३००० रु रोख व सन्मानपत्र,द्वितीय क्रमांकाचे बक्षीस कु .मोहिनी सीताराम कुदळे हिस, २००० रु रोख व सन्मानपत्र व तृतीय क्रमांकाचे बक्षीस कु. वैष्णवी बाळासाहेब राख हिस,१००० रु रोख व सन्मानपत्र असे बक्षीसाचे स्वरूप होते.
हा कार्यक्रम श्री गणेश करे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.या वेळी बोलताना करे-पाटील यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच या बक्षीसांची परंपरा कायम सुरू राहणार असेही सांगितले. पुढच्या वर्षी अनेक विद्यार्थ्यांनी बक्षिसे मिळवावीत अशीही इच्छा त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते श्री तात्यासाहेब ढाणे व श्री बाळासाहेब राख उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक
मुख्याध्यापक श्री नवनाथ मोहोळकर सर यांनी केले. सूत्रसंचालन श्री बाळासाहेब बंडगर यांनी केले.आभार श्री गणेश गायकवाड यांनी मानले. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व कर्मचारी तसेच मोठया संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.