मॅडम, तुमची खूप आठवण येते, वाटते घरी येवून भेट घ्यावी ; शिक्षकदिनी चिमुकलीचे शिक्षकेला पत्र
” मॅडम, तुमची खूप आठवण येते, वाटते घरी येवून भेट घ्यावी ”
—–
शिक्षकदिनी अनार्या कांबळे या चिमुकलीकडून शिक्षिका चंद्रकला टांगडे यांना पत्र
—–
पत्रातून व्यक्त होतोय विद्यार्थी- शिक्षकातील जिव्हाळाकरमाळा – प्रतिनिधी
—–
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असतानाच आलेल्या शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या आठवणी येत असतानाच विद्यार्थ्यांनाही लाडक्या शिक्षकांच्या आठवणी येत असल्याचे स्पष्ट करणारा विद्यार्थी-शिक्षक नात्यातील जिव्हाळ्याचा क्षण शिक्षक दिनाच्या निमित्ताने समोर आला.
करमाळा शहरातील नगरपरिषदेच्या कै. साधनाबाई जगताप मुलींची शाळा क्रमांक एक या शाळेतून मे २०२० मध्ये चौथी पास झालेल्या अनार्या सतीश कांबळे (शाहूनगर, करमाळा) या विद्यार्थीनीने तिच्या शिक्षिका राहिलेल्या चंद्रकला टांगडे यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देताना भावनिक होत एक पत्र लिहिले आहे.
सदर पत्र शिक्षक दिनी सोशल मीडियातून चांगलेच व्हायरल झाले असून त्या पत्रात अनार्याने शिक्षिका टांगडे यांच्या विषयी व्यक्त केलेल्या भावना विद्यार्थी व शिक्षकामधील जिव्हाळा दर्शवित आहे.

दरम्यान मुलींची शाळा क्रमांक एक ही चौथीपर्यंतच असल्याने पाचवीसाठी अनार्याला दुसऱ्या शाळेत जावे लागणार आहे. कोरोनामुळे शाळेत चौथी विद्यार्थ्यांचा होणारा निरोप समारंभही झाला नाही. त्याविषयीची खंत व्यक्त करत “मॅडम, तुमची खूप आठवण येते, वाटते घरी येवून भेट घ्यावी.” अशा शब्दात अनार्याने व्यक्त केलेल्या भावना विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकाचे असलेले स्थान अधोरेखित करत आहेत.

अनार्याने लिहलेले हे पत्र सोशल मीडियातून शिक्षिका टांगडे यांना मिळाल्यानंतर त्यांनी “खूप छान पत्र लिहिले आहे. मला देखील तुमची आठवण येत आहे. अभ्यासाबरोबरच इतर छंद जोपासत जा. पुढील जीवनातही प्रत्येक परीक्षेत तुला यश येवो, नेहमी प्रयत्नशील राहा ही कायम सदिच्छा..!” अशा शब्दात प्रतिक्रिया व्यक्त करुन लाडक्या विद्यार्थीनीला शुभेच्छा दिल्या आहेत.