करमाळाक्राईमसोलापूर जिल्हा

जमीनीच्या वादातुन भावकीतील एकाला जाळुन मारण्याचा प्रयत्न ; करमाळा तालुक्यातील गंभीर प्रकरण

समाचाऱ टीम

जमिनीच्या वादातून वारंवार होत असलेल्या भांडणाचा राग मनात धरून भावकीतील तिघांनी आपलाच चुलत भावाच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये फिर्यादी कानुन बाबर हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यासोबत घराचे छप्पर देखील जळून घराचे नुकसान झाले आहे. सुरुवातीला करमाळा नंतर सोलापूर येथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सदरचा प्रकार हा दि २० रोजी पहाटे अडीचच्या सुमारास हिंगणी ता. करमाळा येथे घडला आहे.

चंद्रकांत बाबर, अनिल बाबर, औदुंबर बाबर सर्व रा. हिंगणी ता. करमाळा असे संशयतांची नावे आहेत. त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर कानून मोहन बाबर (वय ४७) हे गंभीर जखमी होऊन त्यांच्यावर सोलापूर येथे उपचार सुरू आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कानून बाबर व भावकीतील चंद्रकांत, अनिल व औदुंबर यांची शेती जवळजवळ आहे. कायम बांधावरून त्यांचे भांडण होत होते. सतत होणाऱ्या भांडणांचा राग मनात ठेवून सदरचा प्रकार घडल्याचे दिसून येत आहे. कानून बाबर यांचे लग्न झालेले नसल्याने ते एकटेच आपल्या छपराच्या घरात झोपलेले होते.

त्या ठिकाणी रात्री अडीचच्या सुमारास चंद्रकांत बाबर, अनिल बाबर व औदुंबर बाबर हे तिघे आले त्यांनी पेट्रोल सारख्या उग्र वास येणाऱ्या ज्वलनशील पदार्थ हा कानून बाबर यांच्या अंगावर टाकून पेटवले अशी फिर्याद बाबर यांनी दिली आहे. त्यानंतर घरात पेटवल्यामुळे घराचे छप्पर त्यामुळे जळले व मोठ्या प्रमाणावर कानून बाबर हे भाजले आहेत. त्यांना करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून सोलापूर येथे पाठवण्यात आले आहे. सदर घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश भुजबळ हे करीत आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE