माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे यांचे चिरंजीव चेअरमन रणजितसिंह शिंदे यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश
बार्शी – प्रतिनिधी
काराखान्याच्या कारभारामुळे एका शेतकऱ्याच्या मुलींना उच्च शिक्षण देण्यासाठी पैशाची आवश्यकता असताना, केवळ थकीत कर्जामुळे आगळगाव येथील बँकेकडून कर्ज मिळाले नाही. त्यामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत न्यायालयात दाद मागितल्या नंतर माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे (अध्यक्ष, बबनराव शिंदे शुगर इंडस्ट्रीज तुर्कपिंपरी, ता. बार्शी) यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश बार्शीचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. एस. धडके यांनी बार्शी पोलिसांना दिला.

शेतकऱ्याच्या नावावर कागदपत्रे तयार करून बँकेकडून परस्पर ३ लाख रुपये कर्ज उचलल्याचे प्रकरण उघडकीस आले तर शेतकऱ्यांच्या नावे कर्ज उचलणाऱ्या कारखान्यांचे यामुळे धाबे दणाणले आहेत.
या प्रकरणी तुर्कपिंपरी (ता. बार्शी) येथील बबनराव शिंदे शुगर इंडस्ट्रीजचे अध्यक्ष रणजितसिंह बबनराव शिंदे, कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक, शाखाधिकारी (बँक ऑफ इंडिया, शाखा ढगे मळा, बार्शी) व अन्य एक अशा चार जणांवर फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्याचा आदेश बार्शी न्यायालयाने दिला.

शेतकरी श्रीहरी श्रीपती शिंदे (रा. बाभूळगाव) यांनी या प्रकरणी न्यायालयात फिर्याद दाखल केली होती. फिर्यादीनुसार याबाबतची माहिती अशी, बार्शी शहरातील ढगे मळा येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत श्रीहरी शिंदे यांच्या नावाने कागदपत्रे तयार करुन बँक खाते उघडण्यात आले. त्या खात्यावर ३ लाख रुपये कर्ज मंजूर करून शाखाधिकाऱ्यांनी २८ सप्टेंबर २०१६ रोजी रणजितसिंह बबनराव शिंदे यांच्या बँक खात्यावर रक्कम परस्पर वर्ग केली.