संगोबा चोरीत अनेक प्रश्न अनुत्तरीत ; नरुटेंचे पाटबंधारे कर्मचाऱ्यावर थेट आरोप
करमाळा समाचार
आज पहाटेपासून संगोबा प्रकरण गाजत आहे. एकीकडे शेतकरी चोरी झाल्याचे सांगत आहेत. तर अधिकाऱ्यांनी त्याला स्पष्ट नकार दिला होता. पण आता मात्र अधिकाऱ्यांनी चोरी झाल्याचे मान्य केले आहे. परंतु प्रमुख साहित्य चोरीला न जाता जे भंगार साहित्य काढून ठेवले होते अशा साहित्याची चोरी झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी चोरीला गेलेले साहित्यही हजारो रुपयांचे आहे असे सांगण्यात येत आहे.

शशिकांत नरुटे व सहकाऱ्यांनी त्या प्रकरणात सकाळपासून पाठपुरावा केला. त्याला आता यश येताना दिसत आहे. वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे सदरचा प्रकार अधिकच गोंधळाचा होऊन बसला होता. अधिकाऱ्यांनी नीट पाहणी न करता चुकीचे उत्तर दिल्याने सदरचे प्रकरण घडलेच नाही असे वाटू लागले होते. परंतु आता मात्र सर्व प्रकरण उघड होत आहे. थोड्याच वेळात यावर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आली आहे.

जर चोरी झाली होती तर अधिकाऱ्यांनी कशाची पाहणी केली. शेतकऱ्यांनी सांगितला त्यावर का विश्वास ठेवला नाही. शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांसोबत लागेबांधे असल्याचेही आरोप केले होते त्यात कितपत तथ्य आहे असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. चोरी करण्यात वापरण्यात आलेले वाहन राशीन येथील असून सध्या त्या वाहनाचा शोध घेण्यात येत आहे. तर चोरीला गेलेल्या वाहनाची नोंद राशीन पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पण ती गाडी जुनी असुन चोरलेली ही गाडी नव्हती असे नरुटे म्हणत आहे.
प्रतिक्रिया
सदर ठिकाणी गोडाऊन मधून कुलूप उघडून मुद्देमाल घेऊन अनोळखी गाडीत टाकला जातो व पुन्हा कुलूप आहे. तसे लावले जाते यामागे संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांचा हात असल्याशिवाय हे होणे शक्य नाही. त्यामुळे या सर्व प्रकरणाची सविस्तर चौकशी होऊन या सर्वांवर कारवाई करणे गरजेचे आहे. यात कर्मचारी दोषी आढळल्यास निलंबन करुन कारवाई करावी.
– शशिकांत नरुटे, सामाजिक कार्यकर्ते