लाडकी बहीण योजनेत खोडकर भावाची घुसखोरी ; चौकशीची मागणी
करमाळा समाचार
लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडकी बहीण पोर्टलवर महिला ऐवजी पुरुषांनीही अर्ज करीत असल्याचे प्रकार दिसून येत आहेत. यामुळे अखेर संबंधित युवकांची चौकशी करण्याची मागणी संबंधित विभागाकडून करण्यात आली आहे.

मागील काही काळापासून माढा व माळशिरस भागात काही तरुण मुलींची नावे वापरून लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज दाखल करीत आहेत. या ठिकाणी मुलींचे काल्पनिक फोटो वापरले जातात. तर आधार क्रमांक व संपूर्ण आधार, बँक माहिती ही स्वतःची भरली जाते. यावरून शासनाकडून येणारी रक्कम आपल्या खात्यावर जमा करण्याचा हेतू दिसून येतो.

पण प्रत्येक अर्जावर संबंधित विभागाचे बारकाईने लक्ष असून अशा प्रकारचे अवैध अर्ज बाजूला काढले जात आहेत. संबंधित अर्जावर मुलीचे फोटो व नावात थोडा बदल करून मुलगाच अर्ज भरत असल्याचे दिसून येत आहे. तर नुकताच माळशिरस भागात चांदापुरी येथील सुनील वाघमोडे यांनीही अशाच पद्धतीचा अर्ज दाखल केलेला दिसून आला आहे. तरी या संदर्भात बालविकास प्रकल्प अधिकारी माळशिरस यांनी पोलिसात चौकशीची मागणी केली आहे.