मंत्रीमंडळ विस्तारात आमदार शिंदेंची लॉटरी ? ; सोलापूर जिल्ह्यात भाजपा आमदारांसह शिंदेचे नाव आघाडीवर
करमाळा समाचार
सोलापूर जिल्ह्यामध्ये महायुतीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे विस्कटलेली घडी पुन्हा घालण्यासाठी मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामध्ये आता होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये जिल्ह्यामध्ये मंत्रीपद येण्याची शक्यता आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील भाजपाच्या आमदारांशिवाय राष्ट्रवादी अजित पवार गटाचे समर्थक अपक्ष आमदार संजयमामा शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
माढा व सोलापूर या लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचा प्रभाव असतानाही या दोन्ही ठिकाणी महायुतीला पराभव पत्करावा लागला होता. तर माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकलेले धैर्यशील मोहिते पाटील यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीने जिल्ह्यात पकड मजबूत करण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातून मोहितेंसमोर आव्हान उभे करण्यासाठी जिल्ह्यात एक मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.
त्यामध्ये भाजपा आमदार सचिन कल्याणशेट्टी, माळशिरसचे आमदार राम सातपुते यासह अजित पवार गटाचे संजयमामा शिंदे यांच्या नावाच्या चर्चा सुरू आहेत. वास्तविक पाहता सचिन कल्याणशेट्टी यांचे वरिष्ठ पातळीवर असलेला संपर्क व जिल्ह्यात असलेले काम याच्या आधारावर त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. पण मोहिते यांना शह देण्यासाठी ऐनवेळी त्यांच्याच तालुक्यातील विद्यमान आमदार राम सातपुते यांना संधी देऊन भाजपा मोहितेंसमोर आव्हान उभा करण्याचा प्रयत्न करू शकते याशिवाय सातपुते यांचे उपमुख्यमंत्री यांच्याशी अधिकच जवळचे संबंध आहेत त्याचाही त्यांना फायदा होऊ शकतो.
याशिवाय माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये करमाळा व माढा या ठिकाणी महायुतीची झालेली पीछेहाट व मोहितेंचा प्रभाव वाढल्याने मोहितेंचे कट्टर स्पर्धक मानले जाणारे करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांना संधी देऊन महायुतीचा प्रभाव या भागात वाढवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. याशिवाय जिल्हा परिषदेचे माध्यमातून जिल्हाभरात कामाचा दांडगा अनुभव आ. संजयमामा शिंदे यांच्या पाठीशी आहे. तसेच भाजपात असलेली स्पर्धा व त्यातुन होणारे नुकसान टाळण्यासाठी सदरची संधी राष्ट्रवादीला दिली जाऊ शकते. त्यामुळे ऐनवेळी सदरची जागा अजित पवार गटाला सुटल्यास त्या ठिकाणी अजितदादांचे निकटवर्तीय मानले जाणारे संजयमामा शिंदे यांना संधी मिळू शकते अशा चर्चा सध्या सुरू आहेत.