मदर्स डे स्पेशल – एका आईच्या संघर्षाची कहाणी – मोलमजुरी करुन मुलाला केले अधिकारी
प्रतिनिधी | करमाळा
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिंदे कुटुंबीय राहत असताना देखील आपला मुलगा मात्र मोठा अधिकारी व्हावा अशी इच्छा मनाशी बाळगून असलेल्या एका आईने आपले स्वप्न अखेर सत्यात उतरले. ते आपल्या लहान मुलाला उपजिल्हाधिकारी करूनच. या प्रवासात तिने कधी भाजी विकली तर कधी नालाबंडिंगच्या कामावर जाऊन पैसा गोळा केला. पण आपल्या मुलाला तिने अधिकारी करुनच उसंत घेतली. सुरेखा लक्ष्मण शिंदे रा. रावगाव असे आईचे नाव आहे तर सुशांत शिंदे हे सध्या परभणी येथे उपजिल्हाधिकारी म्हणुन कार्यरत आहेत.

रावगाव येथे राहणाऱ्या या शेतकरी कुटुंबातील सुरेखा शिंदे या सातवीच शिकलेल्या. पण त्यांचा मुलगा हा अधिकारी व्हावा त्यांची पहिल्यापासूनच इच्छा होती. घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची असताना एक वेळ खायची भ्रांत होती. पतीच्या एकटाच्या उत्पन्नावर घर चालवणे व मुलांचे शिक्षण अवघड असल्यामुळे सुरेखा शिंदे यांनी करमाळा येथील भाजी मंडई भाजी विक्री करण्यासाठी सुरुवात केली व प्रपंचाचा गाडा हाकण्यात पतीला हातभार लावला.
मुलाने ही आईने ठेवलेला विश्वास सार्थ ठरवत प्राथमिक शिक्षण रावगाव येथे जिल्हा परिषद शाळेत पूर्ण केले. तर पुढील शिक्षण सोलापूर येथे शासकीय तंत्रनिकेतन येथे घेण्याचे नियोजन केले. पण नेमकी दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतात पीक मिळणे अवघड असताना आणि मुलाला तर शिकवण्यासाठी पाठवायचे होते. तर आईने नालाबंडिंगच्या कामावर जायचे ठरवले व तेथून पैसा मिळून मुलाला पुढील शिक्षणासाठी पाठवले. या सर्व कष्टाची जाणीव ही सुशांत यांना होती. त्यांनी अखेर मोठ्या कष्टाने उपजिल्हाधिकारी या पदावर मजल मारली व आपल्या आईचे स्वप्न पूर्ण केले. सध्या मुलासह सुनबाई सौ. स्वाती सुशांत सागिडे यादेखील उपजिल्हाधिकारी असून त्या देखील परभणी येथे कार्यरत आहेत.

माझी आई जेव्हा भाजी विकते तेव्हा मीही त्याच ठिकाणी थांबून तिची ती भाजी विकण्याची कला पाहत असतो. तिझ्याकडुन कष्ट करण्याचे मी शिकलो. माझ्या यशात भावाच्या, नातेवाईक आणी मित्रमंडळींचा तितकाच हातभार आहे. यशस्वी होण्यासाठी पैसा नाही तर पाठबळ आणी कष्ट लागतात तो विश्वास लागतो जो माझ्या घरच्यानी माझ्यावर टाकला. मला घरच्यांनी जी मोकळीक दिली त्यामुळे मी आज मोठा होऊ शकलो. तर प्रत्येक पालकाने आपल्या पाल्यास मनाप्रमाणे शिक्षण करण्याची संधी दिली पाहिजे आपल्या मुलांवर विश्वास ठेवा, त्यांना संधी द्या त्यांच्या कलेला वाव द्या ते नक्कीच यशस्वी होतील असा विश्वास उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यांनी बोलुन दाखवला.