वीज पुरवठा पुर्ववत न केल्यास आंदोलन – बागल
करमाळा समाचार – अमोल जांभळे
करमाळा तालुक्यातील शेती पंपाचा खंडित वीज पुरवठा सुरळीत करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांनी दिला आहे. यासंदर्भात ऊर्जामंत्री तसेच अधीक्षक अभियंता महावितरण सोलापूर यांना निवेदन पाठवले आहे.

करमाळा तालुक्यातील शेती पंपाचा वीज पुरवठा वीज बिल वसुली साठी कुठलीही पूर्वकल्पना न देता वीज वितरण कंपनीने खंडित केला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिके धोक्यात आलेले आहेत. करमाळा तालुक्यातील पाऊस अल्प प्रमाणात झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिके जगवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. कोरोना संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर शेतमालाचे गडगडलेले भाव त्यामुळे शेतकरी संकटात सापडला व पूर्णपणे कोलमडून पडला आहे.

त्यात वीज पुरवठा खंडित केल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. तर वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून जाईल अशी भीती निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. तरी वीजपुरवठा पूर्ववत न केल्यास आंदोलनाचा इशारा या निवेदनाद्वारे बागल यांनी दिला.